कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या गोवावेस येथील कृषी देखाव्याचे श्रीराम सेनेच्या पुढाकाराने पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. कृषी संस्कृतीच्या सन्मानार्थ गोवावेस येथे उभारण्यात आलेला शेतकऱ्याच्या आयुष्यावरील देखावा गेल्या कित्येक महिन्यांपासून दुर्लक्षित होता. याठिकाणी उभारण्यात आलेल्या शेतकरी प्रतिकृतींचे मोठे नुकसान झाले. मात्र श्रीराम सेने हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी पुढाकार घेत सदर परिसराची साफसफाई करत रंगरंगोटी केली आहे.
शेतीच्या व्यवसायाशी नाळ असलेल्या रमाकांत कोंडुस्कर यांनी दुर्लक्षित असलेला सदर देखावा पाहून स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. बुधवारी श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून सदर देखाव्याच्या स्वच्छतेचे काम केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील प्रतिकृतीची अपरिमित हानी झाली होती. सदर देखावा धुळ खात पडला होता, या भागात गवत वाढण्या बरोबरच त्याच्यावर साचलेल्या धुळीमुळे नेमका कोणता देखावा आहे याची ओळख पटत नव्हती.एका दृष्टीने शेतकरी आणि शेती व्यवसायाचा हा अवमानच. हि बाब ओळखून रमाकांत कोंडुसकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा परिसर पुन्हा एकदा उजळला आहे.
श्रीराम सेनेने कृषी संस्कृतीच्या विकासासाठी सदर देखाव्याचे पुनरुज्जीवन केले.गोवावेसच्या एका बाजूला कृषी संस्कृती सांगणारा देखावा तर दुसऱ्या बाजूला खाऊ कट्टा आहे. मात्र एकीकडे कृषी संस्कृतीकडे दुर्लक्ष आणि दुसऱ्या बाजूला खाऊ कट्ट्याला पुढाकार देत प्रशासन शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचे भासत आहे.
खाऊ कट्ट्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेण्याबरोबरच खाऊ कट्टा, स्मार्ट सिटीत शोभून दिसावा या उद्देशाने समोरील भागात पेवर्स तसेच दर्जेदार पत्रे घालण्याचे काम करण्यात आले. मात्र याचठिकाणी असलेला हा देखावा मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्षित ठेवण्यात आला, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.
श्रीराम सेनेने कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आणि श्रमदानातून पुनरुज्जीवित केलेला देखावा, या देखाव्यात असलेल्या गाय, म्हैस, बैल आणि शेतकऱ्याच्या प्रतिकृतीची रंगरंगोटी करून बेळगावकरांची वाहवा मिळविली आहे. अन्नदाता म्हणून पहिल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांवरील इतका सुंदर देखावा गेल्या कित्येक महिन्यांपासून धुळखात पडला होता. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला अन्नदात्यानेच पिकविलेल्या धान्यावर सुरु असलेला खाऊ कट्टा मात्र आकर्षक पद्धतीने चकाकत होता हा मोठा विरोधाभास होता.
शहरातील अशा अनेक छोट्या वाटणाऱ्या परंतु महत्वपूर्ण असलेल्या अशा गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष पुरवत प्रशासकीय गोष्टींचा विचार न करता स्वखर्चातून आणि कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून रमाकांत कोंडुसकर हे मोलाची कामगिरी बजावीत आहेत, हे आजच्या त्यांच्या कार्यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.