बेळगाव लाईव्ह विशेष : ज्येष्ठ वकील, सीमासत्याग्रही, शेतकरी संघटना यासह विविध पदभार सांभाळत शेतकऱ्यांसाठी, मराठा समाजातील तरुणांसाठी भरीव योगदान देणारे ऍडव्होकेट किसनराव येळ्ळूरकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. किसनराव येळ्ळूरकर यांनी आजतागायत अनेक संघ-संस्था सांभाळत विविध क्षेत्रासाठी योगदान दिले आहे. ज्येष्ठ वकील, हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न, क्षत्रिय मराठा परिषदेचा कार्यभार, रयत संघाची जबाबदारी अशा अनेक संघटनांसाठी त्यांनी आजवर मोठे योगदान दिले आहे. प्रदीर्घ आयुष्यातील समाजासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचे समाजाला नेहमीच स्मरण राहील.
९ मार्च १९५६ रोजी झालेल्या पहिल्या सीमासत्याग्रहात ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांचा सक्रिय सहभाग होता. सत्याग्रह संयोजन समितीचे प्रमुख कॉ. शांताराम नाईक, निरंजन मेणसे यांच्या माध्यमातून पहिल्या सीमासत्याग्रहातील पहिल्या तुकडीत ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. हुतात्मा चौकात झालेल्या पहिल्या सत्याग्रहादरम्यान एका सत्याग्रहाच्या घरी काही अडचणी निर्माण झाल्यामुळे एक व्यक्तीची कमतरता पडत होती. या कार्यकर्त्याची उणीव भरून काढण्यासाठी ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांच्याकडे कॉ. शांताराम नाईक आणि निरंजन मेणसे यांनी धाव घेतली. यावेळी दहावीच्या वर्गात शिकणारे ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांनी सीमासत्याग्रहात सहभागी होण्याचे ठरविले.
दहावीची परीक्षा असूनही त्यांनी सत्याग्रहासाठी संमती दर्शविली. सत्याग्रह केला. आणि यावेळी त्यांना तुरुंगवासाची शिक्षाही झाली. यावेळी लोकमान्य टिळकांचे नातून जयवंतराव टिळक हे देखील त्यांच्यासमवेत होते. तुरुंगात जाताना आपल्यासोबत दहावीच्या परीक्षेची पुस्तके घेऊन गेलेल्या ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांचा अभ्यास जयवंतराव टिळकांनी करवून घेतला. १८ वर्षांहूनही लहान वय असलेल्या ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांनी तुरुंगात राहून अभ्यास केला आणि सुदैवाने शिक्षेनंतर परीक्षा असल्याकारणाने त्यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर परीक्षाही दिली.
तुरुग्णातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा चळवळ सुरु केली. विविध चळवळींमध्ये सहभाग घेतला. कार्यकर्ते म्हणून, पहिल्या तुकडीतील सत्याग्रही म्हणून त्यांना मोठा मान मिळाला. पुढे समिती अध्यक्ष तुकाराम सुंठणकर आमदार व्ही एस पाटील यांनी लढा सुरु ठेवला. दरम्यान महाजन समितीच्या अहवालावरून समितीमध्ये फूट पडली आणि कृष्णा मेणसे यांच्या माध्यमातून नवा गट तयार झाला.
पुढे ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांनी शेतकरी कामगार पक्ष, शेतकरी सभा, रयत संघटना यांच्या माध्यमातून बेळगाव आणि विजापूर मधील शेतकऱ्यांसाठी लढा उभारला. यादरम्यान ते शेतकरी नेते म्हणून उदयाला आले. शेतकऱ्यांच्या हितासाठी यशस्वी आंदोलने केली. ऊस उत्पादकांच्या मागण्या, हिडकल जलाशयाच्या कामकाजात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलन, त्यांच्या पुनर्वसनाची मागणी यासह शेतीमालाला योग्य भाव मिळावा, अशा अनेक मागण्यांसाठी त्यांनी यशस्वी आंदोलने केली आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून ते उदयाला आहे.
शेतकरी आंदोलनातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी क्षत्रिय मराठा समाजाची धुरा सांभाळायला सुरुवात केली. क्षत्रिय मराठा समाजातील तरुणांसाठी हॉस्टेल यासह विविध सुविधा मिळवून देण्यासाठी त्यांनी योगदान दिले.
याचप्रमाणे बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदही त्यांची निवड झाली. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी १९९२-९३ साली प्रामाणिक प्रयत्न केले. १९९२-९३ साली हिंदू मुस्लिम दंगे पेटले. यावेळी घरोघरी जाऊन प्रत्येकाला शांतता राखण्याचे, व्यवहार सुरु करण्याचे आवाहन करत प्रत्येकामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. वेळोवेळी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले. मराठा युवक संघाचे खरे संस्थापक मानले जाणारे ऍड. किसनराव येळ्ळूरकर यांनी आजपर्यंत विविध क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचे स्मरण बेळगावमधील प्रत्येक नागरिक आजन्म ठेवेल, यात शंका नाही’. ‘टीम बेळगाव लाइव्ह’तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.