बेळगाव जिल्ह्यातील पूर परिस्थितीकडे जिल्हा पालक मंत्र्यांचे दुर्लक्ष झाले असून अतिवृष्टीमुळे जनतेचे जे हाल होत आहेत त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे.
गोकाक येथील आपल्या कचेरीमध्ये ते आज मंगळवारी पत्रकारांशी बोलत होते. मागील पूर परिस्थितीप्रसंगी देखील सरकार अथवा मंत्र्यांनी जनतेच्या समस्यांची दखल घेतलेली नाही. यावेळी देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कांही ठिकाणी घरे कोसळली आहेत. पुरामुळे बऱ्याच जणांवर आपले घरदार सोडून स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. जनतेच्या हालअपेष्टांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे जारकीहोळी पुढे म्हणाले.
केपीटीसीएल परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी नुकतेच 20 जणांना गजाआड करण्यात आले आहे. तथापि कितीही कठोर निर्बंध घातले तरी कांही उपयोग नाही. कारण पैसे द्या नोकरी मिळवा अशी सध्याची परिस्थिती आहे.
मात्र त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी परिश्रम घेऊन सतत अभ्यास करणाऱ्यांवर अन्याय होत आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी असणाऱ्या परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
या पद्धतीचे गैरप्रकार समूळ नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत, असेही आमदार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.