बेहिशेबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी अंजनेयनगर, बेळगाव येथील सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) पी. शांतकुमार पुन्नास्वामी यांना बेळगाव लोकायुक्त विशेष न्यायालयाने 4 वर्षाचा कारावास आणि 63 लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
हुमनाबाद (जि. बिदर) येथे आरटीओ असताना पी. शांताकुमार पुन्नास्वामी यांनी बेहिशोबी मालमत्ता जमविली होती. बेकायदेशीररित्या जमविलेल्या मायेतून त्यांनी बेळगाव येथील अंजनेयनगर येथे आलिशान बंगला बांधला आहे.
याबद्दल त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी लोकायुक्त पोलिसांनी तपास करून धाड टाकली असता 1 कोटी 62 लाख 14 हजार रुपयांची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली होती.
तत्कालीन लोकायुक्त पोलीस निरीक्षक आर. पी. पाटील आणि पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी पी. शांतकुमार यांच्यावर गुन्हा गुन्हा नोंदवून न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते.
बेळगाव लोकायुक्त विशेष न्यायालयात साक्षीदार तसेच कागदपत्रे तपासण्यात आली. त्यामध्ये पी. शांतकुमार हे दोषी आढळल्यामुळे न्यायाधीश मोहन प्रभू यांनी त्यांना 4 वर्षाचा कठीण कारावास आणि 63 लाख रुपये दंड ठोठावला आहे. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून प्रवीण अगसगी यांनी काम पाहिले.