बेळगाव शहराच्या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे काम या सप्टेंबर महिन्याअखेर पूर्ण केले जावे, अशी सक्त सूचना खासदार मंगला अंगडी यांनी केली आहे. रेल्वे स्थानक नूतनीकरण कामाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी ही सूचना नैऋत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केली.
खासदार मंगला अंगडी यांनी काल सोमवारी बेळगाव रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार अंगडी यांनी उपरोक्त सूचना केली. रेल्वे स्थानक नूतनीकरणाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण केले जावे याबाबतीत कोणत्याही कारणास्तव विलंब खपवून घेतला जाणार नाही.
रेल्वे स्थानकाच्या तळमजल्यासह तीन मजली मुख्य इमारतीचे बांधकाम, एलिव्हेटर बसवणे, पार्किंग सुविधा, प्लॅटफॉर्म क्र. 1, 2, 3 व 4 ची विकास कामे, कोचिंग डेपो व पिटलाईनची उभारणी, रेल्वे स्थानकाचे दक्षिण दिशेचे प्रवेशद्वार वगैरे विकास कामे अंतिम टप्प्यात आहेत.
तेंव्हा इतर किरकोळ लहान कामे वेगाने पूर्ण केली जावीत अशी सूचना खासदारांनी कंत्राटदारास करून शिल्लक लहानसहान कामे त्वरेने पूर्ण केल्यास सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण होतील. एकंदर प्रवाशांच्या सोयीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व कामे पूर्णत्वाला न्यावीत, अशी सूचना त्यांनी केली.
रेल्वे स्थानक आणि रेल्वेच्या डब्यांमध्ये स्वच्छता राखली जाईल याकडे विशेष लक्ष दिले जावे. रेल्वेच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांची विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाव्यात, असे खासदार मंगला अंगडी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नैऋत्य रेल्वेचे अतिरिक्त सरव्यवस्थापक अरुणकुमार, हुबळी विभागाचे अधिकारी संतोषकुमार वर्मा यांच्यासह रेल्वेचे अन्य अधिकारी उपस्थित होते.