मुसळधार पावसामुळे शहरातील उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमधून जाणाऱ्या बेळगाव खानापूर महामार्गावर पाणी येऊन वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सदर प्रकार सातत्याने घडत असल्यामुळे एका ठिकाणी सखल खोलगट असलेल्या या मार्गाची उंची वाढविण्याची आणि दुतर्फा गटारी करण्याची मागणी केली जात आहे.
बेळगाव शहराला आज दुपारी झोडपलेल्या मुसळधार पावसामुळे नाले व गटारीतून तुंबून कांही प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले. उद्यमबागेतील बेळगाव खानापूर महामार्ग हा देखील त्याला अपवाद नव्हता.
मुसळधार पावसामुळे सदर रस्ता जलमय होऊन वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षापासून सातत्याने घडत आहेत. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून देखील सदर समस्या निकालात काढण्याच्या बाबतीत संबंधित खाते पर्यायाने प्रशासन आजतागायक उदासीनता दाखवत आली आहे.
पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या उद्यमबाग येथील रस्त्याबाबत बेळगाव लाईव्हकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना बेळगावचे पहिले महापौर व जेष्ठ कामगार नेते ॲड. नागेश सातेरी यांनी उद्यमबाग येथून जाणारा बेळगाव -खानापूर महामार्ग हा रस्ता पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची दोन प्रमुख कारणे असल्याचे सांगितले. त्यापैकी पहिले कारण म्हणजे या खानापूर रोडवरील श्री मारुती मंदिर ते मजगाव कॉर्नर पर्यंतचा भाग बराच सखल खोलगट आहे.
दुसरे कारण म्हणजे या रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचा निचरा होण्यासाठी चांगल्या गटारीही नाहीत. त्यामुळेच थोडा जरी पाऊस झाला की या रस्त्यावर पाणी साचू लागते. मुसळधार पावसाने तर रस्त्याचा हा ठराविक भाग पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होत असते. हा रस्ता पाण्याखाली जाऊ नये यासाठी या रस्त्याच्या संबंधित सखल भागाची उंची वाढवण्याबरोबरच दुतर्फा चांगल्या गटारी बांधणे अत्यावश्यक आहे.
गेल्या बऱ्याच काळापासून सदर रस्त्याच्या संबंधित भागाची उंची मातीचा भराव वगैरे टाकून वाढविण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठ्या गटारी बांधण्यात याव्यात अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत या मागणीची दखल घेऊन कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळेच सदर रस्ता पाण्याखाली जाण्याची समस्या कायम असल्याचे ॲड. सातेरी यांनी स्पष्ट केले.