चित्रदुर्ग येथील मठाधीशांच्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणाशी संबंधित एका ऑडिओ लिंकमध्ये स्वतःच्या नावाच्या झालेल्या उल्लेखामुळे मनस्तापातून नेगीनहाळ येथील गुरुमडिवाळेश्वर मठाचे मठाधीश श्री बसव सिद्धलिंग स्वामीजींनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सोमवारी सकाळी श्री बसव सिद्धलिंग स्वामीजी त्यांच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आले. दरम्यान मयत स्वामीजींच्या भक्तांनी निदर्शने करत आंदोलन छेडताना त्या ऑडिओ क्लिपमध्ये श्री बसव सिद्धलिंग स्वामीजींबद्दल निंदनीय वक्तव्य करणाऱ्या दोन महिलांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना स्वामीजींचा मृतदेह ताब्यात घेण्यास तीव्र विरोध केल्याचे सांगण्यात आले. धारवाडच्या मनगुंडी गावातील सत्याक्का आणि कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती येथील रुद्रमा हसीनाला या दोन महिलांचे ऑडिओ क्लिपमधील संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार श्री बसव सिद्धलिंग स्वामीजी काल रविवारी रात्री उशिरापर्यंत आपल्या भक्तमंडळींच्या सानिध्यात होते. त्यावेळी बोलताना त्यांनी संबंधित व्हिडिओ क्लिपमध्ये आपल्याबद्दल जे निंदनीय बोलले गेले आहे ते सहन होण्यासारखे नाही. त्यामुळे मला जगावेसेच वाटत नाही असे मनोगत आपल्या भक्त मंडळींसमोर व्यक्त केले होते. त्यानंतर आज सोमवारी सकाळी आत्महत्या करण्यापूर्वी स्वामीजींनी लिहिलेली चिठ्ठी हाती लागल्यानंतर त्यांच्या आत्महत्येची घटना उघडकीस आली.
स्वामीजींनी आपल्या चिठ्ठीत ‘मी कोणतीही चूक केलेली नाही. माझ्या मृत्यूस मी स्वतः जबाबदार आहे. तेंव्हा तपास कार्य हाती घेण्याची गरज नाही. मी या जगाला कंटाळलो आहे. आई कृपया मला क्षमा कर. मठाच्या भक्त मंडळींनीही मला क्षमा करावे. मी मडिवाळेश्वरच्या (देवाच्या) भेटीस जात आहे. तेंव्हा भक्तांनी मठाची काळजी घ्यावी, असा तपशील मयत स्वामीजींच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
चित्रदुर्ग येथील मठामध्ये कशाप्रकारे महिला आणि युवतींचे लैंगिक शोषण केले जाते याची ऑडिओ क्लिप अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सदर क्लिपमध्ये संबंधित दोन महिला मयत श्री बसव सिद्धलिंग स्वामीजी यांची लोकप्रियता आणि त्याला मिळणारा सन्मान याबाबत चर्चा करत असल्याचे दिसून येते, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान मयत स्वामीजींच्या भक्तमंडळींनी लिंगायत धर्मगुरूंना जाणून बुजून लक्ष्य केले जात असून श्री बसव सिद्धलिंग स्वामीजींच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शासन करावे, अशी मागणी बैलहोंगल उपजिल्हा पोलीस प्रमुखांकडे केली आहे.