अनेक दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणी घरे पडण्याच्या तसेच जीर्ण भिंती पडण्याच्या घटना सातत्याने सामोऱ्या येत आहेत.
याबरोबरच प्रामुख्याने शाळांच्या भिंती देखील पडण्याची घटना बेळगाव तालुक्यात सह खानापूर तालुक्यामध्ये देखील घडल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा जीर्ण झालेल्या इमारतीतील शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यासाठी सार्वजनिक शिक्षण खात्याने जुन्या इमारती असलेल्या शाळांची पाहणी करून धोकादायक असणाऱ्या वर्गखोल्या तसेच भिंती दुरुस्त करण्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाची संततधार असल्याने विविध जुन्या इमारतींचे पाया खचून भिंती कोसळत आहेत.परिणामी अशा जीर्ण झालेल्या वर्ग खोल्यांमध्ये शिक्षण घेणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक असून अचानक भिंत पडण्याची घटना घडल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.
मागील महिन्यात खानापूर तालुक्या मधील ग्रामीण भागात देखील शाळेची भिंत कोसळण्याची घटना घडली होती. सुदैवाने विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर शाळेची भिंत कोसळल्याने कोणतीही जीवित हानी झाली नव्हती यामुळे मोठा अनर्थ टळला होता.
याबरोबरच नुकताच गोजगा मराठी शाळेची संरक्षण भिंत देखील कोसळण्याची घटना घडली आहे. यामुळे जुन्या असणाऱ्या शाळांच्या इमारती आणि त्यांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.विद्यार्थ्यांचा धोकादायक इमारतीमध्ये असणारा शैक्षणिक प्रवास धोकादायक ठरत असून याबाबत तातडीने विचार करण्याची गरज आहे.
जिल्ह्यात अनेक सरकारी शाळांची स्थिती बिकट असून वर्ग खोल्यात पाणी गळणे, त्याचबरोबर भिंतीमध्ये पाणी मुरणे संरक्षक भिंत पडणे अशा घटना घडत असून अनुदाना अभावी सदर शाळा त्यामध्ये करून सुरू ठेवण्यात येत आहेत. मात्र एखादी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित असून होत असून विविध धोकादायक इमारतींच्या शाळांच्या इमारतींची पाहणी करून शिक्षण विभागाने प्रभावी पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.