पासपोर्ट संबंधित सेवांच्या सुलभिकरणासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आणखी एका उपायाची घोषणा केली आहे. त्यानुसार गेल्या 28 सप्टेंबर 2022 पासून देशभरातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या (पीओपीएसके) ठिकाणी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट (पीसीसी) उपलब्ध होणार आहे.
बेळगावात एखाद्याला पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हवे असेल तर त्याला कॅम्प येथील हेड पोस्ट ऑफिसच्या ठिकाणी असलेल्या पीओपीएसके येथे जावे लागेल. पीसीसी सुविधा भारतीय नागरिकत्व असलेल्यांना विदेशात नोकरी मिळण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे
त्याचप्रमाणे पोलीस ना हरकत प्रमाणपत्राची गरज असलेल्या शैक्षणिक क्षेत्रासह दीर्घकालीन व्हिसा आणि स्थलांतरासाठी त्याचा उपयोग होणार आहे. विदेशात नोकरीसाठी निवड झालेल्यांसाठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सक्तीचे असते. ज्यामुळे संबंधित व्यक्तीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सिद्ध होते.
गेल्या 27 सप्टेंबरपर्यंत हुबळी, मंगळूर, मराठाहळ्ळी, कलबुर्गी आणि लालबाग या फक्त पाच पासपोर्ट सेवा केंद्रांना पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी अर्ज स्वीकारण्याचे अधिकार होते. मात्र आता पीओपीएसकेला देखील ते अधिकार मिळाले आहेत.
पीसीसी सर्टिफिकेटची वैधता 6 महिन्याची असणार आहे. ते अदा करण्यासाठी वेळेची निश्चित चौकट नसली तरी सर्व बाबींची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर म्हणजे सरासरी दोन ते तीन आठवड्यात ते उपलब्ध होते.