अतिवृष्टी, पूर, रोगाचा प्रादुर्भाव, विकासाच्या नावाखाली शेतजमिनी हडपणे अशा अनेक संकटांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांसमोरील समस्या काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. अतिवृष्टीमुळे चिंतेच्या वातावरणात वावरणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता डुकरांची समस्या निर्माण झाली आहे.
बेळगुंदी, बोकनूर आणि आसपास परिसरात सध्या डुकरांनी उच्छाद मांडला असून या भागातील रताळी, मका, ऊस, शेंगा, बटाटा यासह विविध पिके घेणाऱ्या शेतजमिनीतील पिके उद्ध्वस्त केली जात आहेत.
उत्पादन चांगले व्हावे, उत्तम पीक व्हावे यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पदरी एका मागोमाग एक अशा समस्या उभ्या राहत असून अशा समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हातातोंडाशी आलेले पीक कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जात असून सध्या डुकरांच्या हैदोसामुळे उभे पीक नसत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या भागातील डुकरांचा बंदोबस्त करावा, यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी या भागातील शेतकरी अधिकारी आणि प्रशासनाकडे करत आहेत.