बेळगांव शहर व तालुका फोटो आणि व्हिडियोग्राफर असोसिएशनच्या नुकतीच संपन्न झालेल्या बैठकीत छायाचित्रणाचे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बापट गल्ली येथील गिरीश काॅम्पलेक्सच्या शहिद भगत सिंह सभागृहात बेळगांव शहर व तालुका फोटो आणि व्हिडियोग्राफर असोसिएशनची बैठक संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष डी बी पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, सचिव संजय हिशोबकर, खजिनदार नितीन महाले, नामदेव कोळेकर सुरेश मुंरकुबी आदी उपस्थित होते.
प्रारंभी सचिव संजय हिशोबकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविकात असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओळखपत्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच माण्यवरांच्या हस्ते असोसिएशनच्या सदस्यांना ओळखपत्राचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष डी. बी. पाटील म्हणाले गेल्या दोन -तीन वर्षांत आपला छायाचित्रणाचा व्यवसाय खूप बिकट परिस्थितीत होता. अनेक अडचणींना या काळात आपल्याला सामोरे जावे लागले. आता कुठे हा व्यवसाय हळूहळू तग धरत होता. तथापी हल्ली आपल्याला वाढती महागाई लक्षात घेता हा व्यवसाय ना फायदा ना तोटा या धर्तीवर चालला आहे.
या व्यवसायातील सगळेच साहित्य, पेपर आणि प्रिंटींग महागले आहेत. परिणामी सर्वांनुमते चर्चेअंती छायाचित्रणाचे अर्थात फोटोचे दर वाढवण्यात आले आहेत असे सांगून लवकरच असोसिएशनच्यावतीने सर्व छायाचित्रकारांना वाढीव दर पत्रकाचे वितरण करण्यात येणार आहे.
त्याची लागलीच अंमलबजावणी करावयाची आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीस बाळू सांगुकर, दिपक वांद्रे, दिपक खंडागळे, सतिश मोरे, अनंत चौगुले, सचिन उंडाळे, भरमा मोटरे, अनिल बरगे, शिरीष बिर्जे आदींसह असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. छायाचित्रकार संदीप मुतगेकर यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.