जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून महापालिकेकडून पालखी मिरवणूक व दसरोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक सर्व त्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत तेंव्हा येत्या 5 ऑक्टोबर रोजी बेळगाववासियांनी दसरा सण मोठ्या उत्साहाने शांततेत साजरा करावा असे आवाहन शहराचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले.
म्हैसूर नंतर राज्यात बेळगाव येथे दसरा सण भव्य प्रमाणात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर येत्या बुधवार दि 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी दसरा सण मोठ्या प्रमाणात परंतु शांततेने साजरा करण्यासंदर्भात आज गुरुवारी आमदार ॲड. बेनके यांच्या नेतृत्वाखाली शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या समवेत बैठक पार पडली.
सदर बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदारांनी वरीलप्रमाणे आवाहन केले. कर्नाटकात म्हैसूर नंतर बेळगाव शहरात दसरा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रशासनाच्या सहकार्याने हा उत्सव साजरा केला जात असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे आज आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना उत्सवाचे निमंत्रण देण्याबरोबरच उद्भवणाऱ्या समस्यांविषयी त्यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी प्रसंगी विजयादशमीच्या पालखी मिरवणुकी दरम्यान सर्व सोईसुविधा पुरवाव्यात विशेष करून लाईटची व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे बुजवणे वगैरे कामे केली जावीत. तसेच पोलीस यंत्रणा राबविली जावी अशी विनंती करण्यात आली. तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मनपा आयुक्तांशी संपर्क साधून 5 ऑक्टोबर पूर्वी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिली. त्याचबरोबर सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी पारंपारिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे उत्साहात व शांततेने दसरा उत्सव साजरा करूया, असे आवाहनही त्यांनी केले.
शहर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील यांनी यावेळी बोलताना शहर देवस्थान मंडळ आणि बेळगाव आतील चव्हाण -पाटील परिवारातर्फे 5 ऑक्टोबर रोजी शस्त्र पूजा होणार आहे. चव्हाण गल्लीचा नंदी शिलंगणावर आल्यानंतर दसरा उत्सव पार पडणार आहे. त्या संदर्भात आज आम्ही आमदारांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी ज्या समस्या आहेत त्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या.
त्यावेळी त्यांनी आवश्यक सर्व सोयी सुविधा महापालिकेकडे पुरवण्यात येतील असे आश्वासन दिले आहे अशी माहिती देऊन कोरोना नंतर आपण पहिल्यांदाच भव्य प्रमाणात दसरा उत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करूया असे सांगितले. याप्रसंगी रमाकांत कोंडुसकर, प्रा. आनंद आपटेकर, परशराम माळी लक्ष्मण किल्लेकर, सुनील जाधव आदी उपस्थित होते.