सालाबाद प्रमाणे राकसकोप (ता. जि. बेळगाव) गावातील हौशी युवकांमार्फत खास दसरोत्सवानिमित्त येत्या शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता ‘एक दिवस गावासाठी’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राकसकोप गावातील समाज भवन, राजा शिवछत्रपती चौक या ठिकाणी ‘एक दिवस गावासाठी’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 2021 22 या शैक्षणिक वर्षातील गावांमधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे ताराराणी पदवी पूर्व महाविद्यालय खानापूरचे प्रा. अरविंद पाटील यांचे ‘आधुनिक तंत्रज्ञानाने गाव पण बदलते आहे की काय?’ या विषयावर समाज प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे. तसेच गावातील प्राथमिक माध्यमिक व कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आणि गावातील हौशी कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
एक दिवस गावासाठी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातेरी कंग्राळकर यांच्या अध्यक्षतेखाली धनाजी मोरे, प्रांकुश बेळवटकर, शंकर कंग्राळकर, शिवसंत संजय मोरे, सुरेश मोटार, रवळनाथ मोरे, मोहन पाटील, केदारी मोटर, भावकू मासेकर, गौरव सुतार, परशराम किणयेकर, किसन सुकये यांच्यासह पंचमंडळी व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत.
खास दसरा नवरात्रोत्सवानिमित्त राकसकोप गावातील हौशी युवकामार्फत एक दिवस गावासाठी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले युवक या कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात. या कार्यक्रमाद्वारे परिसरात शेती, शिक्षण, आरोग्य आणि अंधश्रद्धा या विषयावर व्याख्यान आयोजित करून समाज प्रबोधन केले जाते.
त्याचप्रमाणे इयत्ता सातवी, दहावी आणि बारावीसह इतर परीक्षेतील विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. तरी येत्या शनिवारी आयोजित ‘एक दिवस गावासाठी’ या कार्यक्रमास राकसकोपसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.