Tuesday, December 24, 2024

/

शहरातील झाडांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ होणे गरजेचे

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : गेल्या वर्षभरात बेळगावमध्ये विविध ठिकाणी झाड पडून अपघात झालेल्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी हि बाब जीवावर देखील बेतली आहे. एप्रिल महिन्यात काळी आमराई येथे वळिवाच्या पावसात उन्मळून पडलेल्या वृक्षाच्या खाली एका वृद्धाचा जीव गेला. त्यानंतर क्लब रोड येथे पडलेले झाड आणि दोन दिवसांपूर्वी आरटीओ सर्कल येथे झाड पडल्याने झालेला युवकाचा मृत्यू.. अशा वाढत्या घटनांचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.

बेळगाव शहर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. रस्ता रुंदीकरण, फुटपाथ, गटारी अशी अनेक विकासकामे हाती घेताना रस्त्याशेजारी असणाऱ्या झाडांच्या आरोग्याचाही विचार करणे आवश्यक आहे. शहर परिसरात असे अनेक जुनाट वृक्ष आहेत. अनेक वृक्षांच्या फांद्या धोकादायक स्थितीत आहेत. अलीकडे वारंवार उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती, विकासदरम्यान पाडण्यात येणारी झाडे यामध्ये अनेक वृक्षांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अशी धोकादायक झाडे पडून दुर्घटना होण्याच्या प्रमाणात वाढ होत चालली असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.

हल्ली अनेक कार्यक्रमात वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतले जातात. मात्र वृक्षांची लागवड करणे जितके महत्वाचे आहे तितकेच त्या वृक्षांचे संगोपन करणेही आवश्यक आहे, हि बाब प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजविणेही आवश्यक आहे.

शहरात वाढत चाललेल्या धोकादायक झाडांच्या अपघातांसंदर्भात झाडांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे. शहर परिसरात अनेक जुनाट आणि धोकादायक झाडे आहेत. १ झाड पडले किंवा पाडले तर त्याऐवजी १० झाडे लावणे गरजेचे आहे. अशी परिस्थिती असूनही याबाबत गांभीर्याने विचार होताना दिसत नाही.

विकासाच्या नावावर शहरातील अनेक झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल झाली. मात्र जी झाडे खरोखरच छाटणे गरजेचे आहे याकडे मात्र दुर्लक्ष झाले. जुनाट आणि धोकादायक झाडांचे ऑडिट झाल्यास झाड पडण्याची, मालमत्तेची हानी होण्याची किंवा मृत्यूची शक्यता कमी होऊ शकते. झाडे चांगल्या स्थितीत ठेवणे आणि त्यावर उपचार करणे महत्त्वाचे असून झाडांची तपासणी आणि मूल्यांकन करण्यासाठी विविध उपकरणे वापरून, पर्यावरणाचे भान ठेवून, पावसाळ्याच्या तोंडावर धोकादायक झाडांचा तसेच रस्त्यांवर, इमारतींवर लोंबणाऱ्या फांद्यांचे सर्वेक्षण करून त्यांची छाटणी करणे गरजेचे आहे. एकीकडे विकास होत आहे मात्र धोकादायक झाडांसंदर्भात वनविभाग अकार्यक्षम असल्याचे दिसून येत असून यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याची भीती व्यक्त होत आहे.Tress bgm

शहरात अनेक ठिकाणी असे धोकादायक वृक्ष रस्त्यावर अतिशय वाकलेल्या परिस्थितीत आहेत. स्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जीर्ण झाडांची येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना मोठी अडचण होते. यातील बहुतांशी झाडे ही अतिशय जीर्ण आहेत. यामुळे वाहनधारकांसह रस्त्यावरून मार्गस्थ होणारे पादचारी, विद्यार्थी यांच्या अंगावर हि झाडे कोसळण्याची शक्‍यता आहे. जीर्ण झाडे पडून मोठी दुर्घटना होऊ शकते हे बेळगावमध्ये झालेल्या घटनेवरून आपण पहिले आहे.

या ठिकाणावरील झाडांची वेळच्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने छाटणी करावी, शहरातील सर्व रस्त्यांवरील जीर्ण आणि धोकादायक झाडांचे स्ट्रक्चरल ऑडिट व्हावे, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. विविध ठिकाणी अनेक झाडे जीर्ण झाली असून ती झाडे केव्हा कोसळतील याचा नेम नाही. यामुळे अशा धोकादायक परिस्थितीतील झाडे, झाडांच्या फांद्या छाटुन घ्याव्यात आणि होणारी भविष्यातील दुघर्टना टाळावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.