वन खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या त्यांच्या जागी कोण? याबद्दल अद्याप कोणतीच चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण राज्यसभा सदस्यांना इरण्णा कडाडी यांनी दिली आहे.
बेळगाव शहरात आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. वन खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांच्या झालेल्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या जागी आता नेतृत्व कोण करणार? या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही सर्वजण मिळून त्याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे देखील कडाडी यांनी यावेळी स्पष्ट केले. खरंतर कत्ती यांच्या निधनामुळे त्यांच्या नंतर कोण? त्यांची जागा कोण घेणार? हा प्रश्न आमच्या समोरही आहे. भाजप नेतृत्व याबाबत विचारमंथन करत आहे. दिवंगत उमेश कत्ती यांची उणीव भरून काढण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत. आम्ही सर्वजण त्याबाबत चर्चा करणार आहोत असे इरण्णा कडाडी यांनी सांगितले.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मण सवदी या दोघांचा नावाची चर्चा सुरू असल्याची बातमी माध्यमांमधून पुढे येत आहे. त्यावेळेला उत्तर देताना उमेश कत्ती यांच्या जागी नेतृत्व कोणाला द्यायचे? याबाबत कोणाच्या नावाची अथवा कोणतीच चर्चा झालेली नाही असे ते म्हणाले. आमचं काम, आमची शक्ती, आमचं बलस्थान, आम्ही राबवत असलेले उपक्रम, आमचा जनसंपर्क या सर्व बाबींचा विचार करून ज्येष्ठ नेतृत्व योग्य तो निर्णय घेईल. ही एक नेहमीची नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती त्यानुसार होईल, असे कडाडी यांनी नमूद केले. बेळगाव जिल्हा हा राज्यातील एक मोठा जिल्हा आहे या जिल्ह्यात उमेश कत्ती भाजपचे नेतृत्व करत होते. त्यामुळे आमच्या वरिष्ठ नेत्यांसमोर सध्या जिल्ह्याच्या नेतृत्वाचा प्रश्न आहे हे खरे असले तरी विचार विनिमय करून समन्वयाने दिवंगत कत्ती यांची जागा भरून काढली जाईल, असे असा विश्वास शेवटी इरण्णा कडाडी यांनी व्यक्त केला.