बेळगाव शाळेमध्ये दररोज किमान साडेपाच तास विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे, अशी सूचना शिक्षण खात्याने केली आहे. सरकारी व अनुदानित शाळा शिक्षण खात्याच्या नियमाप्रमाणे शाळा भरवत असतात.
मात्र काही खाजगी शाळा नियमबाह्य कमी वेळासाठी शाळा भरवीत असून खाजगी शाळा व्यवस्थापन मनमानी कारभार करत असल्याचे दिसून येत आहे.
काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक असते मात्र वर्गखोल्या कमी असतात. त्यामुळे एलकेजी ते दहावी पर्यंतच्या वर्गांच्या नियोजनासाठी सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात शाळा भरविण्यात येते.
यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचीही धावपळ होते. शाळेच्या वेळेबाबत काही शाळा मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी पालक आणि विद्यार्थ्यांनी दाखल केल्या असून शिक्षण खात्याने यानंतर एक परिपत्रक जाहीर करून दररोज साडेपाच तास विद्यार्थ्यांना शिकविणे बंधनकारक असल्याचे कळविले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून अधिकाऱ्यांनी या शाळा वेळेत भारत नाहीत किंवा साडेपाच तासांपेक्षा कमी वेळेत सोडल्या जातात, त्यांची माहिती घेऊन सूचना करावी, अशा शाळांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.