नसानसात-तनामनात देशभक्ती,धर्मभक्ती, स्वातंत्र्य भक्ती जागविणारा कार्यक्रम म्हणजे दौड. नवरात्र उत्सवात तरुणाईच्या जिव्हाळ्याचा आणि देशभक्ती जागृत ठेवणारा उपक्रम म्हणजे दौड.मागील दोन वर्षापासून कोरोना काळात दौडच्या भव्यतेला ब्रेक लागला होता, मात्र यंदाचा दौडीचा उत्साह द्विगुणित होणार असून हजारोंच्या संख्येने देशभक्तीचे अमृत ओठी घेऊन तरुणाई दौडीत सहभागी होणार आहे. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर धारकरी शिवभक्तांना दौड ची आतुरता लागली आहे.
शिवप्रतिष्ठान श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली आहे. यामुळे यंदाची दौड मोठ्या उत्साहात काढण्याचा निर्धार, प्रत्येक धारकऱ्यांनी केला असून अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या दौडच्या पार्श्वभूमीवर धारकरी सक्रिय झाले आहेत.
दौडसाठी आवश्यक पेहराव पासून ते दौडमधील संदेशा पर्यंतची तयारी करण्यात आली असून विशेष करून सोशल मीडियावर दौड सक्रिय झाली आहे प्रत्येकाच्या डीपी,स्टेटस, व्हॉटसॲप, इन्स्टा, फेसबूक वर आतुरता दौडची असा संदेश पहायला मिळत आहे.
मुखी देशभक्तीचा, पाठ हाती भगवा ध्वज आणि पांढरे वस्त्र,भगवे फेटे परिधान करून तरुण वर्ग मोठ्या उत्साहात दौडमध्ये सहभागी होतो प्रत्येक गल्लोगल्ली निघणारी दौड धर्माप्रती देशाप्रती प्रेम जागृत करते यामुळे मागील दोन वर्षापासून या उत्साहाला मुरड घालण्यात घालावी लागली होती मात्र यंदा हा देशभक्तीचा उत्साह ओतप्रोत भरून वाहत असून यंदाची दौड मोठ्या दिमाखात आणि भव्य प्रमाणात होणार आहे.यामुळेच विविध गल्लीमधून धारकरी यांनी यंदाची दौड यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
छ.शिवाजी महाराजांचा व भगव्या ध्वजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून घटस्थापना ते विजयादशमी म्हणजेच सोमवार दिनांक 26 पासून 5 ऑक्टोबर दरम्यान दररोज पहाटे पाच पासून दौडचा उत्साह संचारणार आहे. यामुळे शिवप्रेरणा निर्माण व्हावी यासाठी दुर्गामाता दौडीत सहभागी होण्यासाठी शिवभक्तांना दौडीची आतुरता लागली आहे.