महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाचे दिवस वाढवून ते 100 ऐवजी 200 करावेत, वाढीव पगार देण्यात यावा आदी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामीण कुलिकार्मिक संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव तालुक्यातील ग्रामीण कुलिकार्मिक संघटनेतर्फे आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील डॉ. आंबेडकर उद्यान येथून या मोर्चाला प्रारंभ झाला. राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल मार्गे काढण्यात आलेल्या या मोर्चात नरेगा योजनेतील शेकडो महिला व पुरुष कामगार सहभागी झाले होते हातात ताट आणि चमचा बडवत निघालेला हा भव्य मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात या मोर्चाचे धरणे आंदोलनात रूपांतर झाले. यावेळी ग्रामीण कुलिकार्मिक संघटनेच्या नेत्यांनी पंतप्रधानांच्या नावे असलेले आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित पंतप्रधानांकडे रवाना करण्याचे आश्वासन दिले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 100 दिवस काम अर्थात रोजगार उपलब्ध करून दिला जातो. हा रोजगार वाढवून 200 दिवस करण्यात यावा. कुदळ, बुट्टी, फावड्यासाठी पूर्वी 10 रुपये दिले जात होते. जे अलीकडे दोन महिने देण्यात आलेले नाही. ही रक्कम वाढवून 20 रुपये इतकी केली जावी.
काम केल्यानंतर कामाचा पगार तात्काळ अदा केला जावा. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये पूर्वी प्रमाणे 100 कोटी रुपयांची तरतूद केली जावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
कट्टणभावीच्या महिला कामगार भारती भांदुर्गे यांच्यासह उपस्थित अन्य कामगारांनी आपल्या मागण्यांबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. रोजगार हमी योजनेअंतर्गत कामगारांच्या आजच्या या आंदोलनामध्ये कट्टणभावी, नागरगाळी, हंदीगनूर वगैरे तालुक्यातील विविध गावांमधील विशेष करून महिला कामगारांचा मोठा सहभाग होता.