आर्ट्स सर्कल बेळगांव तर्फे शनिवार दि. १७ सप्टेंबर रोजी आर् पी डी महाविद्यालयाच्या सभागृहात रुचिरा केदार यांच्या गायनाचा कार्यक्रम सादर झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्षा लता कित्तूर यांनी कलाकारांचे स्वागत केले. मेधा मराठे यांनी कलाकारांचा परिचय करून दिला.
रुचिरा केदार यांनी गायनाची सुरुवात सायंकालीन राग पूरिया धनश्रीने केली. त्यामधील ‘अब तो ऋतुमान’ हा विलंबित एकतालातला ख्याल, ‘भँवर भँवर बोले भँवरा’ ही मध्यलयीतील तीनतालातील बंदिश आणि ‘तोरी जयजय कर्तार’ ही द्रुत एकतालातील बंदिश सादर केली.त्यानंतर “अरे दीवाना किये श्याम क्या जादू डाला” हा कीरवाणी रागावर आधारित भावपूर्ण दादरा त्यांनी अतितन्मयतेने सादर केला.
मध्यंतरापूर्वी त्यांनी खमाज रागावर आधारित “कोयलिया कूक सुनावे” ही ठुमरी आणि “नयी नार नयो रंग ढंग छलबल” ही बंदिश सादर केली.मध्यंतरानंतर रुचिरा यांनी सोहनी रागातील ‘जियरा रे’ ही मध्यलय रूपकमधील बंदिश आणि ‘काहे अब तुम आये हो’ ही द्रुत तीनतालातील बंदिश सादर केली.
त्यानंतर मिश्र गारा आणि मिश्र पिलू रागांवर आधारित एक कजरी त्यांनी सादर केली. तिचे बोल होते ‘राधा रानी कहलवा मानो’.कार्यक्रमाची सांगता भैरवीतील “हरी मेरो जीवन-प्राण आधार” या मीरा भजनाने झाली.
सादरीकरणातील वैविध्य हे देखील सदर कार्यक्रमाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अंगद देसाई आणि रवींद्र माने यांच्या सुयोग्य साथीमुळे देखील कार्यक्रमात रंगत भरली.कार्यक्रमाला रसिकांनी उत्तम दाद दिली. पावसाळी वातावरण असून देखील रसिक चांगल्या संख्येने उपस्थित होते.