देशभरातील गिर्यारोहकांच्या एका पथकाने गढवाल, हिमालयातील माऊंट सतोपंथ हे 7075 मीटर उंचीचे शिखर नुकतेच पादाक्रांत केले. या धाडसी पराक्रमी पथकात बेळगावचा गिर्यारोहक अक्षय देशपांडे याचाही समावेश होता हे विशेष होय.
अक्षय देशपांडे आणि त्याच्या पथकातील गिर्यारोहकांनी गेल्या 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12:45 वाजता माऊंट सतोपंथ हे शिखर काबीज केले. माऊंट सतोपंथ या शिखरावर गिर्यारोहण करण्याची मोहीम म्हणजे हिमालयातील सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याच्या मोहिमेची पूर्व तयारी समजली जाते.
अक्षय देशपांडे याने माऊंट सतोपंथ शिखर यशस्वीरित्या चढून जाणे ही फक्त त्याच्यासाठीच नव्हे तर बेळगाव शहर आणि संपूर्ण कर्नाटकासाठी अभिमानाची बाब आहे असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. अक्षय देशपांडे हा कॉम्प्युटर सायन्स इंजिनियर असून हस्तकलेचा पुरस्कर्ता व खादीचा प्रचारक आहे. साहसी क्रीडा प्रकारांची आवड असणाऱ्या अक्षयने रॉक क्लाइंबिंग तसेच अन्य साहसी क्रीडा प्रकार व पर्वतरोहणाचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे.
दुसऱ्या प्रयत्नात अक्षय देशपांडे याने माऊंट सतोपंथ शिखर काबीज केले आहे. गेल्या मे महिन्यात त्याचा हे शिखर पादाक्रांत करण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला होता. आपला पहिला प्रयत्न शरीरातील प्राणवायूच्या कमतरतेमुळे अयशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
आता पुढील महिन्यात अक्षय माऊंट एव्हरेस्ट चढून जाण्याचा विचार करत आहे. तसेच जगाच्या सर्व खंडांमध्ये सर्वोच्च पर्वत शिखरांवर यशस्वी गिर्यारोहण करण्याचा त्याचा मानस आहे. माऊंट सतोपंथ काबीज केल्याबद्दल त्याचे गिर्यारोहण क्षेत्रात अभिनंदन होते आहे.