बेळगाव तालुक्यातील पूर्व भागांत निलजी मुतगा कणबर्गी परिसरात जवळपास वीस हुन अधिक जनावरे लिंपीने दगवल्यानंतर या रोगाचा शिरकाव बेळगाव शहरात देखील होऊ लागला आहे.
सराफ गल्ली शहापूरमधील अल्पभूधारक शेतकरी नारायण(बाळू) बुध्दाप्पा लाड यांच्या गाईला लिंपी स्किनची लागण होऊन अंगभर गाठी,ताप येऊन अशक्त झाल्याने खासगी डॉक्टरकडून उपाय करुन घेतले तरी याचा काहीही उपयोग न झाल्याने गाय दगावली आहे.
आजारी जनावरांवर सरकारी डॉक्टर ऐवजी खासगी डॉक्टरनां बोलावून उपाय करुन घेण्यात येत आहे पण त्याचाही काहीही उपयोग न झाल्याने गुरुवारी पहाटे शेतकऱ्याची गाय दगावल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.
बळ्ळारी नाल्याच्या बाजूला शेती असल्याने त्यातही नुकसान,आता घरचा आर्थिक रहाटगाडा चालवणारे जनावर गेल्याने हे शेतकरी कुटूंब अत्यंत दुखी झाले आहे. त्यामूळे परिसरातील जनावर पाळणाऱ्यांच्यात धास्ती निर्माण झाली आहे.परवाच धामणे जवळील देवगण हट्टीतील रामलिंग बेडरे यांचीसुध्दा गाय लिंपि स्किननेच दगावली होती.
सरकारने लिंपीने दगावलेल्या जनावरांसाठी महाराष्ट्र सरकारप्रमाणे भरपाई देत कर्नाटक सरकारने देखील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी रयत संघटनेने केली होती त्याची अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांना लिंपीने दगावलेल्या जनावरांवर अंतिम संस्कार करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे याची दखल घेत शेतकरी नेते राजू मरवे यांनी अंतिम संस्कार करण्यासाठी मनपाचे वाहन मागवून घेतले आणि जमेल तितकी मदत केली त्यावरून जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची गरज निर्माण झाली आहे हे स्पष्ट होत आहे.