विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागावा, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, यासाठी जायंट्स सखीच्या सहकार्याने कॅम्प येथील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये वाचनालय सुरू केले आहे. वर्तमानपत्रे, साप्ताहिक, मासिके, दिवाळी अंक, गोष्टींची पुस्तके वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी जायंट्स सखीच्या पदाधिकाऱ्यांना याबद्दलची माहिती दिली व या वाचनालय सुरू करण्याच्या संकल्पनेला मदत करण्याचे आवाहन केले.
मुख्याध्यापकांच्या आवाहनला प्रतिसाद देत गेल्या आठवड्यात जायंट्स सखीने दहा हजार रुपये खर्च करून कपाट तयार करून दिले आणि फक्त कपाट देऊन न थांबता आज वाचनालयाला लागणारी विविध प्रकारची जवळपास पाच हजार रुपयांची पुस्तकेही भेट देऊन खऱ्या अर्थाने वाचनालय सुरू केले आहे त्याबद्दल आम्ही जायंट्स सखीचे अत्यंत ऋणी आहोत असे गौरवोद्गार मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे यांनी काढले.
पुस्तक हस्तांतरण कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर उपाध्यक्षा विद्या सरनोबत, संस्थापक अध्यक्षा ज्योती अनगोळकर, सचिव सुलक्षणा शिनोळकर, माजी अध्यक्षा निता पाटील, उपाध्यक्षा अपर्णा पाटील उपस्थित होत्या.
ही पुस्तके मिथिला अनगोळकर हिच्या वाढदिवसानिमित्त वितरित करण्यात आली. शाळेच्या वतीने मिथिलाचा स्मृतिचिन्ह देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट प्राथमिक शाळेचा नावलौकिक आहे. शैक्षणिक क्षेत्रात या शाळेने नेहमीच आपले वेगळेपण जपले आहे. सगळीकडे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चाललेली असताना या शाळेत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
तसेच ही शाळा नेहमीच नवनवीन उपक्रम राबविण्यात अग्रेसर असते. यात आत्ता विद्यार्थ्यांच्यात वाचन संस्कृती वाढविण्यासाठी या शाळेने अनोखा व सर्वांना आदर्शवत असा प्राथमिक शाळेच्या मुलांसाठी वाचनालयाचा उपक्रम सुरू केला आहे.