श्री गणेश विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषण तसेच विसर्जन तलावांमधील जलप्रदूषणाची तपासणी करण्यासाठी नमुने घेण्यात आले आहेत त्यांचा अहवाल येताच तो पोलिसांकडे सादर केला जाईल आणि मग पोलीस पुढील कारवाई करतील, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण अधिकारी जगदीश यांनी दिली आहे.
बेळगावसह सात जिल्ह्यातील ध्वनी व जलप्रदूषण तपासणीसाठीची प्रयोगशाळा बेळगावमध्ये आहे. या प्रयोग शाळेत सध्या सातही जिल्ह्यातील नमुने पाठविण्यात आले आहेत. बेळगाव शहरातील सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन केलेल्या कपिलेश्वर तलाव, कपिलतीर्थ तलाव, जक्कीनहोंडा, किल्ला तलाव, जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलाव, कणबर्गी तलाव, लाल तलाव व मजगाव येथील ब्रह्मलिंग तलाव अशा 8 तलावांमधील पाण्यांचे नमुने घेण्यात आले आहेत.
श्री विसर्जन होण्याआधी या तलावातील पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. आता विसर्जनानंतर पाण्याचे नमुने घेण्याद्वारे पाणी किती व कशामुळे प्रदूषित झाले? याची तपासणी केली जाणार आहे. पीओपीमुळे पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोताचे प्रदूषण होत नसल्याचा दावा केला जातो.
मात्र किल्ला तलाव, कणबर्गी तलाव तसेच अन्य कांही तलाव हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहेत, हे लक्षात घेऊन सर्वच तलावांच्या पाण्याच्या प्रदूषणाची तपासणी केली जात आहे.
या तपासणीचा अहवाल मिळण्यास विलंब लागणार असला तरी तो हाती येताच पोलिसांकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर पोलीस प्रशासन आवश्यक ती कारवाई करेल असे स्पष्ट करण्यात आले आहे.