किरण जाधव यांची अखिल भारतीय मराठा महासंघ, उत्तर कर्नाटक संघटकपदी निवड :भाजप ओबीसी मोर्चाचे सचिव, मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असलेले विमल फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष किरण जाधव यांची अखिल भारतीय मराठा महासंघ, उत्तर कर्नाटक संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना सन 1900 मध्ये झाली. याचे मुख्य कार्यालय मुंबईत आहे. देशातील 18 राज्यात अखिल भारतीय मराठा महासंघ सक्रियपणे कार्यरत आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष राजेंद्र कोंडरे, उपाध्यक्ष डॉ. वसंतराव मुळिक तसेच आण्णासाहेब पाटील मराठा महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि सचिव प्रमोद जाधव यांनी अखिल भारतीय मराठा महासंघ, उत्तर कर्नाटक विभागाच्या संघटकपदी किरण जाधव यांची नियुक्ती केली आहे.
किरण जाधव हे मराठा समाजाच्या सर्वांगीण हितोन्नतीसाठी नेहमीच कार्यरत असतात. केवळ राजकीयच नव्हे तर मराठा समाजाला शैक्षणिक, सामाजिक आणि उद्योग-व्यवसाय क्षेत्रात उन्नत दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड आहे. युवा नेते म्हणून युवा वर्ग त्यांच्याकडे आशेने पाहतो. त्यांच्याकडे अखिल भारतीय मराठा महासंघ, उत्तर कर्नाटक विभाग संघटकपद आल्याने निश्चितच उत्तर कर्नाटकातील आणि ठोसपणे सीमाभागातील मराठा समाजातील विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकरी समाजाला न्याय मिळणार आहे. यामुळे त्यांच्या निवडीबद्दल मराठा समाजातून समाधान व्यक्त होत आहे.
किरण जाधव हे बेळगाव सकल मराठा समाजाचे संघटक आहेत. मराठा समाजातील विद्यार्थी, महिला विशेषत: मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या समस्यांना प्रतिसाद देऊन मराठा समाजासाठी काम करत आहेत.