बेळगावात श्रमदानाने रस्ता दुरुस्त करण्याची परंपरा 1848 पासूनची असून थ्रोटन्स गॅझेटर 66 मध्ये तसे नमूदही आहे. तेंव्हापासून बेळगावकरांच्या नशीबी लिहिलेले श्रमदान कांही आजतागायत सुटलेले नाही.
1848 मध्ये बेळगावच्या तत्कालीन प्रमुख नागरिकांची समिती स्थापन झाली. या समितीच्या नेतृत्वाखाली अवघ्या चार महिन्यात शहरातील सर्व रस्ते आणि मार्गांची दुरुस्ती करण्यात आली. यापैकी काही रस्ते 9 ते 10 मैला अंतराचे होते. या कामावर खुश होऊन ब्रिटिश सरकारने बेळगावच्या लोकांना गाव सुधारणेसाठी 600 पौड स्टर्लिंग (6000 रुपये) बक्षीसा दाखल दिले. परंतु तरीदेखील जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांची निर्मिती वगैरे कामे राहूनच गेली आणि तोपर्यंत 1852 मध्ये बेळगाव पालिका स्थापन झाली. त्यानंतर आजतागायत 2022 साल उजाडले तरी बेळगावच्या नागरिकांना आपल्या शहरासाठी अद्यापही श्रमदान करावे लागत आहे.
हा फोटोच त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. हे दृश्य आहे शहरातील पोस्टमन सर्कल येथील रस्त्याचे. या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा विटा वगैरे टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवताना दिसत आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील रेल्वे स्टेशननजीकच्या या सुमारे 30 मीटर लांबीच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. ज्याकडे काय कोणास ठाऊक अद्यापही दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. अखेर एक अल्पवयीन मुलगा रस्त्यावरील ते खड्डे बुजवताना आढळून आला. एकंदर यापुढे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यापासून रहदारी नियंत्रण करण्यापर्यंतची कामे नागरिकांनाच करावी लागणार अशी चिन्हे दिसत आहेत. कारण सध्या रहदारी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे कॅम्प येथे खानापूर रोडवर अब्दुल गफार शेख हे हॉटेल चालक शालेय विद्यार्थी -विद्यार्थिनींच्या सुरक्षततेसाठी रहदारी नियंत्रणाची जबाबदारी सांभाळत आहेत.
थोडक्यात अत्यंत दुर्दैवाची आणि खेदाची बाब ही आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी चांगले रस्ते, वाहतुकीचे नियोजन वगैरे सारख्या जनतेच्या साध्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकडे बेळगावचे प्रशासन डोळेझाक करत आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली तरी आम्ही काय मागतोय तर फक्त चांगले रस्ते, गटारी वगैरे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी सणानिमित्त चौका चौकात मोठमोठे बॅनर आणि जाहिरातींवर लाखो -करोडो रुपयांची उधळपट्टी करतात.
परंतु रस्त्यावरील खड्डे मात्र दुरुस्त केले जात नाहीत. त्यामुळे प्रशासनावर विसंबून न राहता शहराच्या सुधारणेसाठी खारीचा वाटा म्हणून स्वयंस्फूर्तीने कार्य करणाऱ्या त्या मुलासह संबंधित सर्व स्त्री-पुरुषांना सलाम!