प्रशासनाने जनावरांना होणाऱ्या लंपी स्कीन रोगाविषयी खानापूर तालुक्यात जनजागृती करून पाळीव जनावरांचे लसीकरण करावे, अशी मागणी खानापूर म. ए. समितीने तहसीलदारांकडे केली आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी खानापूर तहसीलदारांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदारांच्या गैरहजेरीत उपतहसीलदार मॅगेरी यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
पाळीव जनावरांना होणाऱ्या लंपी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये या रोगाविषयी जनजागृती करावी. तेच प्रशासनातर्फे सर्व जनावरांना रोगप्रतिबंधक लस देऊन रोगाचा होणारा प्रादुर्भाव रोखून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. तहसीलदारांसह पशु संगोपन खात्याचे अधिकारी डॉ. एम. जाधव यांनाही हे निवेदन देण्यात आले.
निवेदन देऊन जनावरांना होणाऱ्या लंपी रोगावर उपाय योजना कराव्यात व तालुक्यामध्ये विभागावर लसीकरण करावे, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी डॉक्टर एम. जाधव यांनी तालुक्यामध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कशा पद्धतीने उपाययोजना व पाळीव जनावरांचे लसीकरण केले जात आहे याची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी देवापांण्णा गुरव, पी. एच. पाटील, सूर्याजी पाटील, सुरेश देसाई, बळीराम पाटील, रवी पाटील, किरण पाटील, रवींद्र शिंदे, राजू पाटील, राजाराम देसाई रणजीत पाटील, नागेंद्र जाधव, धोंडाप्पा पाटील, पी. जी. कुलम आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.