श्री गणेशोत्सवासाठी शहरातील रस्त्यांची व पथदिपांची दुरुस्ती करावी या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या मागणीला प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्यामुळे आणि गेल्या दोन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अधिकच दयनीय झाली आहे. श्री विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील कपिलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिजवरील (आरओबी) रस्त्याची तर अत्यंत दुरवस्था झाली असून त्याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
श्री गणेशोत्सवासाठी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी गणेशोत्सव महामंडळाने केली होती मात्र त्याकडे जिल्हा प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्यामुळे बऱ्याच रस्त्यांवर अजूनही खड्डे आहेत. याखेरीज काही ठिकाणी रस्त्यावर पथदीप देखील नाहीत. विशेष करून श्री विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील कपिलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिजवरील (आरओबी) रस्ता अत्यंत खराब झाला असून त्याकडे लक्ष देण्याची मागणी महामंडळाने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि मनपा मुख्य कार्यकारी अभियंताकडे करूनही त्याची म्हणावी तशी दखल घेण्यात आलेली नाही.
आता नुकत्याच झालेल्या पावसामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली आहेत. परिणामी देखभाल नसलेल्या या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचलेले गढूळ पावसाचे पाणी ये -जा करणारे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी मनस्ताप देणारे ठरत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या मागणीनंतर ओव्हर ब्रिजनजिकच्या शनी मंदिर परिसरातील रस्त्याची पेव्हर्स घालून डागडुजी करण्यात आली असली तरी ब्रिजवरील रस्त्याकडे मात्र साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. कपिलेश्वर तलाव आणि कपिलेश्वर तीर्थ या ठिकाणी तसेच जक्कीरहोंड (रामतीर्थ) येथे विसर्जनासाठी सार्वजनिक श्री गणेश मूर्तींची मिरवणूक या ब्रिजवरून काढण्यात येते.
त्याचप्रमाणे भाविक घरगुती पाच, दिवसाचे सात दिवसाचे गणपतीही या ब्रिजवरून कपलेश्वरकडे नेतात. या सर्वांची ब्रिजवरील खराब रस्त्यामुळे गैरसोय होणार आहे. तेंव्हा सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी जोरदार मागणी गणेश भक्तांकडून केली जात आहे.