सीमाभागातील मराठी भाषिकांवर कन्नड संघटनांसह येथील प्रशासनाचाही नेहमीच रोष असतो. या ना त्या प्रकारे सातत्याने मराठी भाषिकांना डावलणाऱ्या, मराठी भाषिकांवर दडपशाही करणाऱ्या कर्नाटकात आता एका चित्रपटामुळे कन्नड संघटनांनी नवा गोंधळ सुरु केला आहे.
सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि प्रोडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटच्या सहयोगाने अवधूत गुप्ते प्रस्तुत, दिग्दर्शक विशाल सखाराम देवरुखकर आणि निर्माते लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांच्या ‘बॉईज ३’ या चित्रपटावरून कन्नड संघटनांनी नेहमीच्याच तालावर नवे नाटक सुरु केले असून या चित्रपटातील एका प्रसंगावरून कन्नड संघटनांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे.
बॉईज ३ या चित्रपटात दाक्षिणात्य पेहेरावात असलेले अभिनेते एका प्रसंगात बेळगावच्या मराठी भाषेबद्दलचा अभिमान असल्याचे सांगतात. आपण मराठी आहोत आणि मराठी असल्याचा अभिमान नाही तर माज असल्याचा डायलॉग एका प्रसंगात चित्रित करण्यात आला आहे. या डायलॉगवरून कन्नड संघटनांना पोटशूळ आला असून यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमा विवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप तथाकथित कन्नड संघटनानी केला आहे.
इतकेच नाही तर हा चित्रपट महाराष्ट्र एकीकरण समितीने प्रदर्शित करण्याची योजना आखल्याचेही कन्नड संघटनांचे म्हणणे आहे. बेळगाव सीमाप्रश्नी या चित्रपटाने गलथान कारभार केला असून बेळगावसह राज्यभरात कोठेही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा पवित्राही या कन्नड संघटनानी घेतला आहे.
हा चित्रपट कर्नाटकात कुठेही प्रदर्शित झाल्यास मोठा विरोध करण्याची तयारी असल्याचे संघटनेने म्हटले असून सीमा आणि भाषिक हिताच्या रक्षणासाठी अशा चित्रपटाला प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन बेळगाव पोलीस आयुक्तांना केले आहे.
कन्नड संघटनांनी कितीही आणि कसाही आटापिटा केला तरी बेळगावची मराठी अस्मिता यत्किंचितही डगमगणार नाही यात तिळमात्र शंका नाही.