बेळगाव लाईव्ह विशेष : जगात कुठेही शिक्षकांचा आदर केला जातो. काही शिक्षक हे असे असतात जे केवळ आयुष्यावरच प्रभाव टाकत नाहीत तर जीवनातही स्थित्यंतरे घडवून आणतात. शिक्षक विदयार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यास आणि त्यांना आकार देण्यास सज्ज असतात. जी भावी स्वप्ने मुले उराशी बाळगून असतात, ती स्वप्ने समजून घेत प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात.
शिक्षकाचे काम हे मार्गदर्शक, समुपदेशकाचे किंवा दिशादर्शकाचे असते. बेळगावमधील असेच शिक्षक आनंददायी, नावीन्यपूर्ण, पद्धतीचा अध्यापनात वापर व तणावमुक्त अध्ययन प्रक्रियेचा अवलंब करत विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनावर राज्य करत आहेत. शिक्षक दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांच्या खास अध्यापनाच्या प्रक्रियेविषयी….
“संस्कृती एज्युकेअर”चे संस्थापक तेजस कोळेकर यांनी मानसशास्त्रात बॅचलर शिक्षण पूर्ण केले आहे. मुलांना भावनिक आणि व्यावहारिकदृष्ट्या आधार देण्यासाठी पालकांना तयार करून मुलाचा पूर्ण क्षमतेने विकास करण्याचे महत्त्व समजून घेऊन, ‘बाल विकास कार्यक्रम आणि पालकत्व’ या सत्रांवर काम करत आहेत.
तेजस कोळेकर हे UCLA (युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेलिस) चे प्रमाणित आंतरराष्ट्रीय करिअर समुपदेशक देखील आहेत. तेजस हे हेल्थकेअर आऊटसोर्सिंग इंडस्ट्रीमध्ये गेल्या १५ वर्षांपासून अनुभवी व्यावसायिक आहेत आणि त्याच बरोबर त्यांनी हेल्थकेअरला प्रोत्साहन देण्यासाठी डायरेक्ट सेलिंगमध्ये काम केले आहे ज्यामुळे त्यांना सध्याच्या मानसिक समस्यांबद्दल मौल्यवान ज्ञान मिळाले आहे.
तेजस कोळेकर मुलांना त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांसाठी जीवनातील मूलभूत गोष्टी शिकवतात आणि त्यांच्या समस्यांवर आत्मविश्वासाने मात करण्यास मदत करतात. त्याचवेळी, तेजस कोळेकर पालकांना त्यांच्या मुलांना निरोगी, आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्यासाठी, मदत करण्यासाठी प्रोत्साहित करतात. यावर त्यांनी काही सुंदर लेखही लिहिले आहेत, जे ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ सह अनेक दैनिक, मासिक, साप्ताहिकात प्रकाशित झाले आहेत.
तेजस कोळेकर हे “संस्कृती एज्युकेअर” च्या माध्यमातून निरोगी पालक-मुलाच्या नातेसंबंधासाठी “वन-टू-वन” समुपदेशनासह कार्यशाळा आणि विशेष शिबिरे आयोजित करतात. अलीकडेच, त्यांनी “वेणुध्वनी 90.4 रेडिओ स्टेशनवर” तरुणांसाठी “योग्य पालकत्व आणि व्यक्तिमत्व विकासाचे” पाच भाग रेकॉर्ड केले आहेत.
याचप्रमाणे स्थानिक वृत्तवाहिनीवर “मानसिक आरोग्याचे महत्त्व” या विषयावर कार्यक्रम देखील सादर केला आहे. तेजस कोळेकर हे उद्यमबाग मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे समुपदेशक म्हणून काम करतात. तसेच सेंट पॉल हायस्कुल येथे समुपदेशक म्हणूनही काम पाहतात. याचप्रमाणे कॉर्पोरेट्स, शाळा, महाविद्यालये, संस्था आणि स्वयंसेवी संस्थांसोबतही काम केले आहे. तेजस कोळेकर हे मानसशास्त्राच्या पार्श्वभूमीतून आले असून सर्व कार्यक्रम मनोवैज्ञानिक समजुतीने आणि मुख्यतः मर्यादित क्षमतेसह इव्हेंटमध्ये सहभागी होणार्या मुलांना किंवा पालकांवर लक्ष केंद्रित करण्यावर आधारित असतात.
अलीकडच्या नव्या शिक्षण पद्धतीनुसार मुलांना सर्व गोष्टी ‘अड्जस्ट’ करणं जितकं अवघड आहे तितकंच त्यांच्या पालकांनाही अवघड आहे. सुपरफास्ट आणि कॉम्पिटिटिव्ह युगात मुलांना टिकवण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर तणावमुक्त शिक्षण आणि शिक्षण पद्धतीची आवश्यकता आहे. मुलांची आणि त्यांच्या पालकांची मानसिकता समजून घेऊन आजच्या युगात त्यांचा टिकाव लागण्यासाठी मानसिक आरोग्यासह शिक्षणाचे धडे देणारे तेजस कोळेकर हे आधुनिक प्रचलित शिक्षण पध्दतीत महत्वपूर्ण शिक्षकाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या या कार्याला “बेळगाव लाइव्ह”च्या खूप साऱ्या शुभेच्छा!