अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली असून कटकोळ पोलिसांनी 24 तासात खुनाचा छडा लावताना त्या पत्नी व प्रियकराला गजाआड केले आहे.
लक्ष्मी पाडप्पा जटकन्नावर आणि रमेश बडिगेर (वय 36) अशी पोलिसांनी गजाआड केलेल्या आरोपींची नावे आहेत. रामदुर्ग तालुक्यातील होसुर गावांमधील पुलाखाली काल एका इसमाचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह पाडप्पा जटकन्नावर (वय 35) याचा असल्याचे स्पष्ट झाले होते.
याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर वेगाने तपास चक्रे फिरवत अवघ्या 24 तासात या प्रकरणाचा छडा लावला असून सदर खून अनैतिक संबंधातून घडल्याचे उघडकीस आले आहे. कटकोळ पोलिसांनी आज मंगळवारी सकाळी पाडप्पा याच्या खून प्रकरणी त्याची पत्नी लक्ष्मी आणि तिचा प्रियकर रमेश यांना अटक केली.
पतीचा खून केल्यानंतर लक्ष्मीने आपल्या प्रियकराच्या मदतीने त्याचा मृतदेह मोटरसायकल वरून आणून होसुर येथील पुलाखाली टाकला होता. त्यानंतर मोटरसायकल एका ठिकाणी सोडून देऊन आरोपी फरारी झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना शिताफीने गजाआड केले आहे.