गेले ९ दिवस उत्साही वातावरणात सुरु असलेला गणेशोत्सव आणि यंदा दहाव्या दिवशी निघणारी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलीस विभागाने कंबर कसली असून मिरवणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मिरवणूक वेळेत, शांततेत आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी आज डीसीपी रवींद्र गडादि यांच्या नेतृत्वाखाली बैठक बोलाविण्यात आली होती.
पुणे मुंबई नंतर देशात बेळगावतच गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कर्नाटकात बेळगावची विसर्जन मिरवणूक ही फार मोठी असते त्यासाठी पूर्ण राज्यातील पोलीस दलाचं लक्ष बेळगावकडे केंद्रित असतं म्हणून बेळगाव पोलिसांनी बंदोबस्तासाठी विशेष तयारी केली आहे
मिरवणुकीदरम्यान गालबोट लावू पाहणाऱ्या महाभागांसाठी पोलिसांनी पथसंचलनाच्या माध्यमातून इशारा दिला असून हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बेळगावमधील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मिरवणूक काळात शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाईचा इशारा देत स्वतः जातीने लक्ष देऊन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डीसीपी रवींद्र गडादी यांनी बैठकीत दिली.
शुक्रवारी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने विविध जिल्ह्यातून अधिक पोलीस बळ मागविण्यात आले असून विसर्जन मार्गासह विविध ठिकाणी पोलीस तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. २५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, गुन्हे विभाग, सहायवाणी, सहायवाणी केंद्र, १० ड्रोन कॅमेरे , केएसआरपी पथक, सीआरओ आणि आरएफओ पथक देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती गडादि यांनी दिली. विविध जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मिरवणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली असून टिळकवाडी, अनगोळ आणि बेळगावमधील काही संवेदनशील परिसरात मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत, मिरवणूक काळात कोणीही कायदा हातात घेतल्याचे आढळून आल्यास तातडीने त्याठिकाणी जाऊन कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती डीसीपींनी बैठकीत दिली.
याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळांनी वेळेत मिरवणुकीत सहभागी होऊन मिरवणूक न लांबवता वेळेत मिरवणुकीची सांगता करावी, असे आवाहनदेखील डीसीपींनी केले. विसर्जन मिरवणुकीसाठी विविध ठिकाणाहून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना नागरिकांची गर्दी हाताळताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामुळे पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली.
या बैठकीला शहर पोलीस आयुक्त डॉ. एम बी बोरलिंगय्या, विविध पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.