उत्तर कर्नाटकातील वैशिष्टपूर्ण असलेल्या बेळगावच्या गणेशोत्सवाची सांगता काल शुक्रवारी म्हणजेच अनंत चतुर्दशीने झाली. मागील वर्षाप्रमाणे यंदा कोरोनाचे कोणतेही निर्बंध नसल्यामुळे मुक्त जल्लोषी वातावरणात काल सायंकाळी सुरू झालेली श्री विसर्जन मिरवणूक आज शनिवारी दुपारी तब्बल सुमारे 18 तास झाले तरी सुरूच आहे. उत्सवाची धार्मिक परंपरा आणि पावित्र्य राखून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या जयघोषात सार्वजनिक श्री मुर्तींना जड अंतकरणाने निरोप देण्यात येत आहे.
यंदा पोलीस प्रशासनाच्या काही नियम अटी वगळता उत्सवावर कोणतेच निर्बंध नसल्यामुळे काल अनंत चतुर्दशी दिवशी सकाळपासूनच बाप्पाच्या निरोपाची तयारी करण्यासाठी सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये लगबग सुरू झाली होती. भातकांडे गल्लीच्या मंडळाने सर्वप्रथम दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास कपिलेश्वर तलावांमध्ये श्री मूर्तीचे विसर्जन केले. त्यानंतर दिवसभरात अनेक श्री मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. सकाळच्या सत्रात प्रामुख्याने घरगुती गणपतींचे विसर्जन पार पडले तर दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्री मूर्तींचे विसर्जन केले. कपिलेश्वर येथील दोन्ही तलाव मराठा मंदिरनजीकचा जक्केरीहोंड येथे श्री मुर्तींचे विसर्जन झाले. घरगुती मूर्तींचे किल्ला तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले तर अनगोळ आणि जुने बेळगाव येथील तलावाच्या ठिकाणीही श्री मूर्ती विसर्जनासाठी गर्दी झाली होती.
शुक्रवारी सायंकाळी हुतात्मा चौक येथील सुरू झालेली श्री विसर्जन मिरवणूक लांबली असून आज शनिवारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत गणेश विसर्जनाचा उत्साह कायम आहे. शहरातील कपिलेश्वर जुना व नवा तलाव दोन्ही प्रमुख विसर्जन तलावाच्या ठिकाणी आज दुपारचे 12:30 वाजले तरी सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन अवरीत सुरूच आहे. याचवेळी चव्हाट गल्लीचा आणि त्यामागे श्री शनी मंदिराच्या ठिकाणी खडक गल्लीचा राजा असे दोन गणपती कपिलेश्वर उड्डाण पुलावरच आहेत. याखेरीज जुन्या तलावावर तीन -चार आणि नव्या तलावावर सात असे जवळपास 15 सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनाच्या तयारीत आहेत उत्तर भागाकडे दोन आणि दक्षिण भागात दोन असे चार गणपती विसर्जन मार्गावर आहेत. या पद्धतीने एकंदर 20 श्री मूर्तींचे विसर्जन अद्याप होणे बाकी आहे काल सायंकाळी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक अशा प्रकारे जवळपास 18 तास उलटून गेले तरी सुरूच आहे. विसर्जन तलावाच्या ठिकाणी महापालिकेने क्रेन वगैरे आवश्यक सर्व ती सिद्धता केलेली आहे. आज शनिवारचा दिवस आठवडा अखेर असल्यामुळे गणेश भक्तांचा उत्साह तीळभरही कमी न होता अधिकच ओसंडून वाहत आहे. मिरवणूक लांबली असली तरी पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठी मारायच्या काही घटना वगळता कोणतेही गालबोट न लागता आतापर्यंत अपूर्व जल्लोष, उत्साह व शांततेमध्ये गणरायांचे विसर्जन सुरू आहे. श्रीमूर्ती विसर्जनाचा वेग पाहता मिरवणूक समाप्त होण्यास आज सायंकाळचे 4 वाजतील असा अंदाज आहे.
मुंबई पुण्यानंतर सर्वात मोठा गणेशोत्सव हा बेळगावमध्ये साजरा करण्यात येतो. मात्र कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षात हा उत्सव निर्बंधांचा चौकटीत साजरा करावा लागला होता. कोरोना निवळल्यामुळे सर्व निर्बंध हटवण्यात आल्याने यंदाच्या श्री विसर्जन मिरवणुकीमध्ये अपूर्व उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. काल अनंत चतुर्दशी दिवशी दुपारपासून विसर्जन तलाव गणेश भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते.
शहरातील पहिला मानाचा सार्वजनिक गणपती असणाऱ्या झेंडा चौकातील गणपतीसह अन्य सार्वजनिक गणपतीचे ढोल ताशाच्या दणदणाटात फटाक्यांची आतषबाजी करत कपिलेश्वर तलावात विधीवत विसर्जन करण्यात आले. यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला. शहरातील बहुतांश सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी काल दुपारनंतर मंडपाबाहेर काढण्यात आल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या गणेश मूर्ती घेऊन सवाद्य फटाक्यांची आतषबाजी करत तलावाच्या ठिकाणी येताना दिसत होते. दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत सार्वजनिक श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी मंडपाबाहेर काढण्यात येत असल्यामुळे शहरातील शेवटच्या सार्वजनिक श्री गणेश मूर्तीचे विसर्जन होण्यास आजचा दुसरा दिवस उजाडला आहे.
श्री गणेश विसर्जन सुरळीत पार पडावे यासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा सशस्त्र पोलीस दल, केएसआरपी तुकड्यांसह परजिल्ह्यातूनही अतिरिक्त पोलिस कुमक मागविण्यात आली आहे. एकंदर बंदोबस्तासाठी 3000 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याखेरीज पोलिसांची होयसाळ व शक्ती वाहने सातत्याने गस्तीवर आहेत. त्याचप्रमाणे ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह साध्या वेशातील पोलिसांची सर्व घडामोडींवर नजर आहे.