महापालिकेने सार्वजनिक गणेश उत्सव मंडपांच्या परिसरातील स्वच्छता मोहीम राबविण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सखल भागात गटारीतील पावसाचे सांडपाणी साचून अनेक मंडळांची गैरसोय होत आहे. गेल्या दोन दिवसातील मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका वंटमुरी कॉलनीतील साई गणेशोत्सव मंडळाला बसला आहे. अचानक पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गटारी तुंबून सांडपाणी मंडपात घुसल्यामुळे काल रात्री सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतली तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासन यंदा कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. श्री गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून सूचना केल्या तरी संबंधित खात्याकडून अंमलबजावणीच होत नसल्यामुळे त्याचा फटका गणेशोत्सवाला बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन-तीन दिवसापासून दुपारनंतर बेळगाव शहर परिसरात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. जोरदार पावसामुळे शहर उपनगरातील गटारी तुंबून येथील रस्ते जलमय होत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने गणेशोत्सवापूर्वी शहरातील गटारी स्वच्छ कराव्यात अशी मागणी केली होती. मात्र या मागणीकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे मुसळधार पावसानंतर सखल भागात पाणी साचून राहिल्याने अनेक मंडळांची गैरसोय होत आहे.
विशेष करून वंटमुरी कॉलनी रस्त्यावर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन येथील सार्वजनिक श्री साई गणेश युवक मंडळाच्या विघ्नहर्ता मंडपात मोठ्या प्रमाणात केरकचऱ्यासह सांडपाणी तुंबण्याचा प्रकार घडला आहे. पाणी निचरा होण्यास जागाच नसल्यामुळे या ठिकाणी मोठी गैरसोय निर्माण झाली होती. याबाबतची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देताच सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सरचिटणीस महादेव पाटील, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, स्वागताध्यक्ष मदन बामणे व सागर पाटील यांनी लागलीच काल रात्री वंटमुरी कॉलनी येथे मदतीसाठी धाव घेऊन परिस्थिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे मनपा आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली.
सार्वजनिक श्री साई गणेश युवक मंडळाच्या मंडपा शेजारील गटारीची आज दुपारी तात्पुरती साफसफाई करून गटारीवर फरशी घालण्यात आली आहे. तथापि हा निव्वळ तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असून खरंतर येथील केरकचरा, गाळ साचलेल्या गटारी व्यवस्थित संपूर्ण स्वच्छ करावयास हव्यात अन्यथा आता पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास मंडप परिसर जलमय होणार आहे. या मंडळातर्फे येत्या 4 सप्टेंबर रोजी गणहोम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा या ठिकाणच्या गटारींची युद्धपातळीवर स्वच्छता करण्याचा आदेश महापालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
गटार तुंबण्याखेरीज श्री साई गणेश युवक मंडळाच्या मंडपानजीक असलेल्या पथदिपाच्या खांबावरील हाताच्या उंचीवर असलेला फ्युज बॉक्सही जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे. हेस्कॉमकडून अत्यंत निष्काळजीपणे बसविण्यात आलेल्या या फ्युज बॉक्समधील विजेच्या जिवंत तारा उघड्यावर आहेत. याकडेही गांभीर्याने लक्ष देऊन सदर फ्युज बॉक्स धोकादायक ठरणार नाही या पद्धतीने तात्काळ व्यवस्था केली जावी, अशी मागणी केली जात आहे.