सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटात सेंटपाल्स शाळेने तर मुलींच्या गटात संत मीरा शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस (लेले) मैदानावर पार पडलेल्या या फुटबॉल स्पर्धेतील मुलांच्या गटातील अंतिम लढतीत सेंटपाल्स शाळेने प्रतिस्पर्धी संत मीरा शाळेचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
विजेत्या सेंटपॉल्सच्या जोशवा वाज, नवलशेख सराफ व अथर्व बिडीये याने प्रत्येकी 1 गोल तर संत मीरातर्फे वैभव मरगाळा याने एकमेव गोल केला.
मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने प्रतिस्पर्धी सेंट जोसेफ शाळेचा पेनल्टी शूटआउटवर 4-2 अशा गोल फरकाने पराभव करीत जेतेपद हस्तगत केले. विजेत्या संत मीरा संघातर्फे रेनिवार माशेय, सलामी कोलाराई, खोबरूस एम. डी., स्वरा आंजनकर यांनी तर सेंट जोसेफ शाळेच्या सायली व झोया यांनी आपापल्या फटक्यांचे गोल मध्ये रूपांतर केले.
आता विजेते दोन्ही संघ आगामी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी बेळगांव शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तालुकास्तरीय स्पर्धेला पंच म्हणून कौशिक पाटील, ओमकार सावगांवकर, योगेश सावगांवकर, जयेश सांबरेकर व मानस नायक यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जयसिंग धनाजी, बापूसाहेब देसाई, चंद्रकांत पाटील, मारुती मगदूम, संजीव बडगेर, आर. पी. वंटगुडी, शहराच्या पीईओ जाहिदा पटेल आदिंनी विशेष परिश्रम घेतले.