उसाला प्रति टन 3500 रुपये दर दिला जावा आणि हा दर निश्चित केल्यानंतरच राज्यातील ऊस कारखाने सुरू करावेत, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेने सरकारकडे केली असून तशा आशयाचे निवेदन आज सादर करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बुधवारी सकाळी निदर्शने करून कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी प्रथम निदर्शने केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
राज्यात उसाचा हंगाम सुरू होत आहे. ऊस तोडणी हंगाम सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे. त्यामुळे यावेळी उसाचा भाव वाढवून देण्यात यावा. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाचा प्रतिक्विंटल दर 3500 रुपये इतका निश्चित करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी म्हणाले, आज सर्व 14 तालुक्यातील शेतकरी नेते येथे आले आहेत. यंदाचा ऊस तोडणी हंगाम सुरू करण्याची तयारी सर्वच साखर कारखाने करत आहेत. तथापि यावेळी उसासाठी 3500 रुपये प्रति टन दर निश्चित करूनच कारखाने सुरू केले जावेत. शेतकऱ्यांच्या शेत जमिनीला रात्रीच्या वेळी जलसिंचन करण्यासाठी हेस्कॉम वीज देत नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.
लवकरच कारखानदार आणि हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना बोलावून सुवर्ण विधानसौध येथे बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र त्या बैठकीत शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी येत्या 10 ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसह आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असेही पुजारी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकरी नेते व शेतकरी उपस्थित होते.