बेळगावLive विशेष: असाध्य गोष्टी साध्य करण्याची क्षमता असणाऱ्या अभियंत्यांसाठी १५ सप्टेंबर हा दिवस विशेष असतो. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त यादिवशी राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातो. आधुनिक भारतात अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका निभावणारे भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती दिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय अभियंता दिनी जपानस्थित बेळगावचे अभियंते सुमेरसींह सतीशराव चीरमोरे यांच्याशी केलेली बातचीत…
बेळगावचे नाव आज केवळ राज्य आणि देशपातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील गाजत आहे. बेळगावमधील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांनी आजवर अनेक देशात बेळगावचे नाव उंचावले आहे, यात अभियंता क्षेत्र तरी कसे मागे राहील? बेळगावमध्ये शिक्षण घेऊन सध्या जपानमध्ये नामांकित कंपनीत कार्य करणारे सुमेरसिंह हेही यापैकीच एक!
मूळचे बेळगावचे सुमेरसींह सतीशराव चीरमोरे हे सध्या जपानमध्ये नामांकित मित्सुबिशी मोटर्स कार्पोरेशनमध्ये कार्यरत आहेत. सेंट मेरीज येथे शालेय शिक्षण, सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयात ‘इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिकस’ डिप्लोमा आणि त्यानंतर गोगटे कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण करत, टीसीएस कंपनीमध्ये काम करत, फायनल प्रोजेक्ट सबमिशनच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू अंतर्गत २०१९ सालापासून मित्सुबिशी मोटर्स कार्पोरेशन कंपनीत कार्यरत आहेत. वयाच्या २५ व्या वर्षी परदेशी जाऊन आपल्या कामाच्या माध्यमातून देशाचे नाव उंचावण्यात चिरमोरे यांचे मोठे योगदान ठरत आहे.
भारत हा बहुभाषिक देश आहे. भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. मात्र जपानमध्ये सर्वाधिक जापनीज भाषेवर भर दिला जातो. जापनीज भाषेवर प्रभुत्व मिळविल्यास जपानमध्ये प्राधान्याने नोकरी मिळते. सुमेरसिंह यांनी जापनीस भाषेवर प्रभुत्व मिळविले आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकी शिक्षण घेताना जर्मन भाषाही अवगत केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टीसीएस कंपनीमध्ये ३ महिने कार्यरत असणाऱ्या सुमेरसींह यांनी जर्मन भाषेचे प्रशिक्षण घेतले. टीसीएस कंपनीच्या केरळ शाखेत ३ महिने तर पुणे येथे १ वर्ष कार्य करत जपानमधील मित्सुबिशी कंपनीत त्यांनी काम सुरु केले. इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स या शाखेचा अभ्यास पण मित्सुबिशी कंपनीत अचानक ऑटोमोबाइल्स विभागात काम करणे हे आव्हान सुमेरसिंह यांच्यासमोर होते. मात्र हे आव्हानदेखील पेलत त्यांनी मित्सुबिशी मधील ऑटोमोटिव्ह क्षेत्रात अशापद्धतीने कामगिरी केली आहे कि २ वर्षांसाठी असलेला जपानमधील बिझनेस प्रोजेक्ट ६ महिन्यांसाठी पुन्हा वाढवण्यात आला. यानंतर सातत्याने प्रगतीच्या दिशेने कार्य करत २ वर्षांचा अवधी आता ४ वर्षे इतका झाला आहे.
अमेरिका आणि युरोपियन देशांमधील नोकऱ्यांची स्थिती अस्थिर असताना जपानमध्ये मात्र कायमस्वरूपी नोकरीची हमी आहे. त्यातही अभियांत्रिकीचे शिक्षण असल्यास येथील अधिक संधी वाढतात. तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या जपानमधील अनुभव सांगताना सुमेरसिंह सांगतात कि, जपानमध्ये भारतीय नागरिकांना मोठा मान आहे. तंत्रज्ञानाने जरी प्रगतीपथावर हा देश असला तरी येथील लोक भारतीय लोकांच्या हुशारीवर अधिक फिदा असतात. लोकसंख्या कमी आणि तंत्रज्ञान अधिक अशी स्थिती असणाऱ्या जपानमध्ये प्रत्येक गोष्ट हि तंत्रज्ञानावरच आधारित आहे. मात्र हे तंत्रज्ञान तयार करण्यासाठी, हाताळण्यासाठी जापनीज लोक आणि येथील कंपन्या भारतीय लोकांना अधिक पसंती देतात. अतिशय मैत्रीपूर्ण आणि आदरपूर्ण स्नेहसंबंध भारतीयांशी जपणाऱ्या जापनीस लोकांमध्ये सध्या सुमेरसिंह भारताचा डंका वाजवत आहेत. जपानमधील तंत्रज्ञान आणि वेगवान विकास याचा अभ्यास करून भविष्यात भारतात देखील नवे तंत्रज्ञान आणायची सुमेरसिंह यांची इच्छा आहे.
तत्पर, वेगवान, तंत्रज्ञानाशी एकरूप झालेल्या जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणून संबोधले जाते. मात्र येथील तंत्रज्ञान हाताळण्यासाठी जापनीज लोकांना विश्वासू लोकांचीच अधिक गरज असते. ऑटोमोटिव्ह क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या या देशात असंख्य भारतीय आपल्या कलेचा, शिक्षणाचा आणि प्रतिभेचा वापर करून भारताचे नाव अधिक उंचावत आहेत. सुमेरसिंह चिरमोरे हेदेखील यापैकीच एक. सुमेरसींह हे उद्यमबाग येथील उद्योजक आणि प्रेसीम्याक इंडस्ट्रीजचे मालक श्री सतीशराव कृष्णकांत चीरमोरे व सौ. स्मिता सतीशराव चीरमोरे यांचे चिरंजीव होत. त्यांच्या या कार्याचे ‘टीम बेळगाव लाईव्ह’ कडून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा!