बेळगाव लाईव्ह विशेष : देशभरात नवरात्रोत्सव साजरा होत आहे. देशातील प्रत्येक भागात नऊदिवस आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा अर्चना केली जाते. आनंददायी आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रीत आजच्या काळातील नवदुर्गांचेही स्थान तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये नवदुर्गा सामावली आहे. आई, बहीण, पत्नी, मैत्रीण, मुलगी, सून अशा अनेक नात्यांच्या माध्यमातून नवदुर्गेच्या स्वरूपात आपल्या आजूबाजूला वावरणारी प्रत्येक स्त्री हि नवदुर्गाच आहे. ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून गेली ३ वर्षे अशा नवदुर्गांचा सन्मान ‘नवदुर्गा’ या सदराच्या माध्यमातून केला जातो. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला, श्रमजीवी, विविध संस्था-संघटनांच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देणाऱ्या, बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करणाऱ्या अशा अनेक महिलांचा सन्मान या सदरातून करण्यात येतो.. आजची आपली नवदुर्गा आहे, शिक्षण क्षेत्रातील अनघा-वैद्य गोडसे! नवरात्रीच्या निमित्ताने या नवदुर्गेच्या आयुष्याच्या प्रवासाबाबत ‘टीम बेळगाव लाईव्ह’ ने केलेली खास बातचीत…
अनघा वैद्य-गोडसे मूळच्या बेळगावच्या. १९९० साली बेळगावमधील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अनघा वैद्य यांची आई शिक्षिका असल्याने शिक्षण क्षेत्राचे बाळकडू त्यांना आईकडूनच मिळाले. शिक्षणाबद्दलचे महत्व, लहानपणापासून असलेली शिक्षणाची ओढ यामुळे शिक्षण क्षेत्रात त्यांना मागे वळून पाहण्याची गरज लागली नाही. बालिका आदर्श येथे शालेय शिक्षण, आरपीडी महाविद्यालयात पदवीपूर्व आणि पदवी शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत राणी चन्नम्मा विद्यापीठात त्यांनी मराठी विषयातून एम. ए. पूर्ण केलं. पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून बेळगावमधील नवसाहित्य बुक स्टॉल मध्ये नोकरी केली. शिक्षणाची आवड आणि आयुष्यात काहीतरी साध्य करायचे आहे या भावनेने पुन्हा शिक्षणाला सुरुवात केली. राणी चन्नम्मा विद्यापीठातून मराठी विषयातून एम. ए. पूर्ण करून पुन्हा बी. एड.चे शिक्षणही पूर्ण केले.
२०१४ साली जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. शाळेपासूनच वाचनाची आवड असणाऱ्या अनघा वैद्य यांनी वाचनाची आवड जोपासत लोकमान्य ग्रंथालयात पहिले पुस्तक वाचन केले. शालेय शिक्षण पूर्ण करून पदवीपूर्व महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून सेवा बजाविताना अनेक चढउतार झेलावे लागले.
मात्र कुटुंबीयांची साथ, जिद्द आणि चिकाटी यामुळे परिस्थितीवर मात करून आपल्याला जे साध्य करायचे आहे त्यादिशेने त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवले. आज प्राध्यापिका म्हणून सेवा बजाविताना सूत्रसंचालन, मुलाखतकार, वक्त्या, लेखिका अशा विविध स्वरूपात त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले आहे. विविध वृत्तपत्रातून त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत.
आजच्या काळात शिक्षण आणि अभ्यास याचे महत्व खूप मोठे असून कोणत्याही परिस्थितीत शिक्षण थांबवू नये असा सल्ला त्या देतात. अनुभवाशिवाय मोठा शिक्षक नाही. त्यामुळे अपयशाने खचून न जाता, स्वतःला कमी न लेखता आपल्या ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणे महत्वाचे असल्याचे त्या सांगतात.
आपल्या चुकांवर नाव ठेवणारे अनेक आहेत. मात्र आपण या गोष्टीमुळे न खचता स्वतःवर विश्वास ठेवून, समोर येणाऱ्या संकटांवर मात करून प्रयत्नशील राहावे, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, आत्मविश्वासाने पुढे जावे, असा सल्ला अनघा वैद्य यांनी आजच्या तरुणाईला दिला आहे. शिक्षण क्षेत्रात ज्ञानरूपी दान देणाऱ्या अनघा वैद्य-गोडसे यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ‘बेळगाव लाईव्ह’ च्या खूप साऱ्या शुभेच्छा!