बेळगाव शहरातील संचयनी सर्कल ते ग्लोब टॉकीज सर्कल दरम्यानचा कॅम्प येथील खानापूर रोड शालेय विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. त्या ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती केली जावी अशी मागणी करण्यात येत असली तरी यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे या रस्त्याचे आणखी थोडे रुंदीकरण करून फूटपाथची आणि योग्य जागी किमान दोन ठिकाणी फुट ओव्हर ब्रिजची उभारणी करण्याचे मत व्यक्त होत असून तशी सार्वत्रिक मागणी पुढे येऊ लागली आहे.
शहरातील संचयनी सर्कल ते ग्लोब टॉकीज सर्कल दरम्यानचा कॅम्प येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 -अ अर्थात खानापूर रोड हा रस्ता अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अलीकडच्या काळात विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर एका विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर कॅम्प भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या रस्त्याच्या पूर्वेला बी. के. मॉडेल हायस्कूल, कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल, सेंट मेरीज हायस्कूल, इस्लामिया हायस्कूल तर पश्चिमेला सेंटपॉल हायस्कूल, सेंट जोसेफ हायस्कूल, केंद्रीय विद्यालय, मिलिटरी स्कूल या शाळा आहेत. या भागात बायपास रोड किंवा रिंग रोड नसल्यामुळे खानापूर रोडवर अहोरात्र 24 तास वाहतूक असते.
सदर रस्त्याच्या दोन्ही टोकाला शहराबाहेर ट्रक टर्मिनल नाहीत. परिणामी अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आली तरी ट्रक चालक फार काळ थांबून न राहता संधी मिळाली की आपली वाहने या रस्त्यावरून दामटत असतात. त्यामुळे या ठिकाणी रहदारी पोलिसांची नियुक्ती करून वाहतूक नियंत्रण करण्यास किंवा नागरिकांचा त्याबाबतीतील पुढाकार याला कांही मर्यादा आहेत. या बाबी लक्षात घेता सर्वोत्तम उपाय म्हणजे संचयनी सर्कल ते ग्लोब टॉकीज सर्कल दरम्यानच्या खानापूर रोडवरील नागरिकांना विश्वासात घेऊन आणखी थोडे भूसंपादन करण्याद्वारे या रस्त्यावर फूटपाथची निर्मिती करणे. त्याचप्रमाणे हा रस्ता ओलांडण्यासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागू नये यासाठी कॅम्प खानापूर रोडवर तज्ञांच्या सल्ल्याने योग्य ठिकाणी दोन फूट ओव्हर ब्रिज उभारणे, ही काळाची गरज बनली आहे. यासंदर्भात प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने मार्ग संस्था व नागरिक हितरक्षण समिती यांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते विकास कलघटगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी देखील केली आहे.
कॅम्प येथील खानापूर रोडवरील फुट ओव्हर ब्रिज आणि फुटपाथ नागरिकांसह विशेष करून शालेय विद्यार्थ्यांसाठी अतिशय हितावह ठरणार आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यालयानजीकच्या ग्लोब टॉकीज सर्कल येथे पंचमुखी रस्ता आहे. पाच रस्ते या ठिकाणी एकत्र मिळणाऱ्या या रस्त्याच्या ठिकाणी प्रस्ताव मांडण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज सारख्या पर्यायाची नितांत गरज आहे. या ठिकाणी एका बाजूला कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाची ब्रिटिशकालीन दगडी आवार भिंत आहे. ही भिंत थोडीफार हटवून ब्रिजची सोय केली जाऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. शहरातून जाणाऱ्या खानापूर रोडवर पूर्वी वनिता विद्यालयानजीक बुडाने एक फूट ओव्हर ब्रिज उभारला होता. हिंडलगा, बेळगुंदी वगैरे शहराच्या पश्चिम भागातील ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी या ब्रिजची उभारणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी यंदे खूट येथे सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे फूट ब्रिज चढून जाण्याची तसदी न घेता लोक थेट रस्ता ओलांडून जात होते. त्यामुळे तो ब्रिज कालांतराने कुचकामी ठरला. नव्या ब्रिजच्या ठिकाणी याची पुनरावृत्ती होऊ नये याचीही दखल घेतली गेली पाहिजे. यासाठी प्रशासन आणि रहदारी पोलिसांनी फुट ओव्हर ब्रिज बाबत जनजागृती करून लोकांमध्ये फुट ब्रिज वापरण्याची शिस्त लावली पाहिजे.
रस्ते वाहतूक सुरक्षा बैठकीत केवळ कागदी निर्णय घेण्यापेक्षा वरील प्रस्तावावर ठोस निर्णय घेणे गरजेचे असून त्याची कार्यवाही तात्काळ करून अंमलबजावणी करायला हवी अशी मागणी वाढू लागली आहे.शालेय मुलांसाठी धोकादायक बनलेल्या खानापूर रोड संदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीमध्येही दखल घेतली गेली पाहिजे. मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बोर्डाने आपल्या बैठकीत फुट ब्रिज, फुटपाथ यासारख्या पर्यायांवर चर्चा करून तात्काळ निर्णय घेणे आवश्यक बनले आहे. प्रशासन सरकारकडून आयटी पार्कसाठी बेळगाव शहरानजीक शेकडो एकर जमिनीच्या भूसंपादनाला तात्काळ परवानगी दिली जाते तशी कॅम्प खानापूर रोडवर फुट ओव्हर ब्रिज आणि फुटपाथ बांधण्यास त्वरित परवानगी मिळाली पाहिजे. उज्वल भविष्याची असलेल्या आयटी पार्क पेक्षा शालेय विद्यार्थ्यांचा जीव कितीतरी पटीने महत्त्वाचा आणि अमूल्य आहे असेही बोलले जात आहे.
सततची रहदारी असलेल्या या रस्त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे याकडे सर्वप्रथम लक्ष दिले गेले पाहिजे. आयटी पार्कच्या त्या 700 एकर जमिनीसाठी लोकप्रतिनिधींकडे थेट दिल्लीपर्यंत जाऊन केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यास वेळ आहे, मात्र शहरातील या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे वेळ नाही का? बेळगाव शहरात स्थानिक खासदार व आमदारांसह अन्य आमदारांची घर आहेत. कॅम्प येथील खानापूर रोडवर शालेय मुलांचा जीव धोक्यात येत आहे हे त्यांच्या निदर्शनास येत नाही का? असे प्रश्न सध्या जागरूक नागरिकांकडून केले जात आहेत. तसेच कॅम्प खानापूर रोडवरील फूट ओव्हर ब्रिज आणि फुटपाथच्या पर्यायाचा सर्व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.