अतिवृष्टीमुळे गेल्या एक दोन महिन्यात शहरानजीकच्या बळळारी नाल्याला सध्या चौथ्यांदा पूर आला आहे. या पुरामुळे परिसरातील जवळपास 600 ते 800 एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
गेल्या कांही दिवसांपासून बेळगाव शहरासह जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. परिणामी नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. बेळगाव शहरात नजीकचा बळळारी नाला देखील याला अपवाद नाही. सदर नाल्याच्या साफसफाईकडे वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. नेहमीप्रमाणे सध्याच्या अतिवृष्टीमुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. स्वच्छते अभावी यंदाच्या पावसाळी मोसमात सध्या बळळारी नाल्याला चौथ्यांदा पूर आला आहे.
बळळारी नाल्याचे पाणी पात्रा बाहेर ओसंडून वाहत असल्यामुळे नाल्याच्या परिसरातील अनगोळ शिवार, वडगाव शिवार, शहापूर शिवार, जुने बेळगाव शिवार, हालगा शिवार, बेळगाव शिवार पाण्याखाली गेली आहेत. नाल्याच्या आसपासच्या सुमारे 800 एकर शेत जमिनीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी या जमिनीतील बहरात आलेले भात पीक तसेच नुकतेच पेरलेले नव्हे तर लावणी केलेली भाताची रोपे पाण्याखाली जाऊन नष्ट झाली आहेत. बळळारी नाल्याला अलीकडेच तीन वेळा पूर आला असून प्रत्येक वेळी प्रामुख्याने भात पिकासह ऊस, भाजीपाला वगैरे अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सध्याच्या पुरामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे एकरी जवळपास 50 ते 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे. बेकायदेशीर हालगा -मच्छे बायपास रस्त्यामुळे तर या नुकसानीमध्ये अधिकच भर पडली आहे. थोडक्यात शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ठ कोसळले असून त्यांचे एकूणच कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झाला असून शासनाने या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई न दिल्यास त्यांच्यावर गंभीर परिस्थिती ओढवणार आहे.
बल्लारी नाल्याचा विकास आणि त्याच्या स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांना पुराच्या संकटाला सामोरे जावे लागते. नाला स्वच्छतेच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्यामुळे कंटाळलेले शेतकरी सरकारने आम्हाला आमच्या पिकांची नुकसान भरपाई दिली नाही तरी चालेल परंतु त्याऐवजी बळळारी नाल्याची स्वच्छता करून दिली जावी अशी मागणी करत आहेत. आम्हाला फक्त बळ्ळारी नाला गाळ वगैरे काढून स्वच्छ करून द्या. मग कितीही पूर येऊ दे आम्ही त्याला घाबरणार नाही असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही आजतागायत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सध्याची पूर परिस्थिती पाहता स्थानिक लोकप्रतिनिधींना खरोखर जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्यांनी सध्या बळळारी नाल्यातील किमान जलपर्णी काढून आमच्यावर उपकार करावेत असे मत शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केले जात आहे.
सदर नाल्याला अलीकडे सातत्याने पूर येऊन पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना किमान एकरी 50 ते 60 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी केली जात आहे. दरवेळी सरकारकडून मंजूर झालेल्या नुकसान भरपाईच्या रक्कमवर काही प्रमाणात मधल्या मध्ये डल्ला मारला जातो असा आरोप आहे. त्यामुळे यावेळी मंजूर झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील बांधापर्यंत जाऊन दिली जावी, अशीही मागणी होत आहे.
बेळगावचे ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी आज सकाळी बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधी सोबत बळ्ळारी नाला परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीबद्दल हळहळ व्यक्त केली. नाल्यातील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्यामुळे येथे सातत्याने पूर परिस्थिती निर्माण होते याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी पाटील यांनी केली. दरम्यान पावसाचा जोर जर असाच कायम राहिल्यास खरीप पिकांमागोमाग जमिनीत ओल राहिल्यामुळे आगामी रब्बी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा धोका असल्याचे जाणकारांचे मत आहे.