पशुसंगोपण खात्याने पाळीव जनावरांमधील लंपी स्किन रोगाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता कोरोना काळात ज्याप्रमाणे कंटेनमेंट झोन करण्यात आले होते त्याप्रमाणे झोनची निर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे.
दरम्यान ज्या गावात बाधित जनावरे आढळून येत आहेत त्या गावातील जनावरे बाहेर काढण्यात येऊ नयेत. तसेच त्या गावातील नागरिकांनीही विनाकारण बाहेर फिरू नये अशी सूचना प्रशासनाने केली आहे. बाधित जनावरांवर घरपोच उपचार केले जात आहेत.
लंपी स्कीन रोगाचा हवेमार्फत प्रसार होत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. रोगाची लागण झालेल्या गावांमध्ये लसीकरण करण्याचे टाळले जात आहे. कारण दुसऱ्या गोठ्यात गेल्यास निरोगी जनावरांना त्याची बाधा होत आहे. ज्या गावांमध्ये बाधित जनावरे आहेत त्या गावापासून 5 कि. मी. अंतरावर असलेल्या गावांमधील निरोगी जनावरांना लस टोचली जात आहे. एकंदर लंपी स्कीन रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशु संगोपन खात्याने आता कंबर कसली आहे.
लंबी स्कीन हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला त्याची लागण होत आहे. यासाठी बाधित जनावरे गोठ्या बाहेर काढू नयेत. गावातूनही अशी जनावरे बाहेर नेऊ नयेत. त्यासाठी पशु संगोपन खात्याने कोरोना काळात केलेल्या कंटेनमेंट झोन पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. बाधित जनावरांना उपचारासाठी दवाखान्यात किंवा बाहेर नेण्याची गरज नसून पशु संगोपन खात्याकडून पशुपालकांच्या घरापर्यंत जाऊन जनावरांवर उपचार केले जात आहेत.
बाधित गावांना कंटेनमेंट झोन म्हणता येईल, अशी माहिती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पाटील यांनी दिली. तसेच जनावरांच्या आठवडी बाजारवर देखील जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. सर्व पशु पालकांनी खबरदारी बाळगल्यास या रोगाचा प्रसार रोखता येऊ शकतो असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.