प्रवेश बंदीमुळे चोर्ला घाटात अवजड वाहनांची रांग-बेळगावच्या भाजीपाल्यावर गोव्याच्या जनतेने विसंबून राहू नये अशा गोवा मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आता तेथील सरकारने आणखी एक नवीन पाऊल उचलले आहे. गोवा सरकारने एका आदेशाद्वारे अवजड वाहनांच्या कर्नाटक सीमेवरील चोर्ला घाटातून गोव्यातील प्रवेशावर बंदी घातली आहे.
गोवा सरकारच्या आदेशानुसार आज पहाटेपासून चोर्ला घाटामध्ये ट्रक, लाॅरी वगैरे अवजड वाहने रोखण्यात आली. अवजड वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने त्यांच्या गोव्यातील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.
उत्तर गोवा रहदारी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. या संदर्भात गेल्या 21 सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती.गोव्याचा संपर्क रस्ता असणारा रामनगर -गोवा रस्ता गेल्या तीन वर्षापासून बंद आहे.
या पार्श्वभूमीवर आता चोर्ला घाटामार्गे अवजड वाहतुकीवर बंदी घालण्यात आल्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या ट्रक, लॉरी यासारखी अवजड वाहने सध्या केरी -बेळगाव राज्य महामार्ग क्र. 01 मोठ्या संख्येने अडकून पडली आहेत. परिणामी गोव्याच्या सीमेनजीक या रस्त्याच्या एका बाजूला अवजड वाहनांची भली मोठी रांग लागल्याचे पहावयास मिळत आहे.