कॅम्प येथील रियल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणी त्याच्या पत्नी व मुलीसह पुणे येथील एकाला अशा एकूण तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडल्याचे उघडकीस आले आहे.
रोहिणी सुधीर कांबळे (मयताची पत्नी), स्नेहा सुधीर कांबळे (मयताची मुलगी) आणि अक्षय महादेव विठकर (रा. पुणे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुधीर भगवानदास कांबळे (वय 57, रा. मद्रास स्ट्रीट कॅम्प) या रियल इस्टेट व्यावसायिकाचा खून झाल्याचे गेल्या शनिवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आले होते.
आदल्या दिवशी 16 सप्टेंबरच्या रात्री 11 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 या वेळेत या व्यावसायिकाचा खून झाला होता. सुधीरच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक चौकशीतून या प्रकरणात स्वकीयांचा सहभाग असल्याचा संशय बळावला.
अखेर तपासाअंती कौटुंबिक कलहातून उपरोक्त तिघांनी संगणमताने सुधीर याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. मयत सुधीरची पत्नी रोहिणी ही मूळची पुण्याची आहे. त्याचप्रमाणे मुलगी स्नेहा अलीकडे पुण्याला गेली असता तिचा परिचय अक्षय विठकर यांच्याशी झाला. त्यातून अक्षयचा कांबळे घराण्याशी घरोबा वाढला. खुनाच्या दोन दिवस आधी पुण्यातील अक्षय विठकर बेळगावात आला होता. रोहिणी व स्नेहा यांनी त्याची शहरातील एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर संगनमताने तिघांनी मिळून सुधीरचा खून केला.
खून केल्यानंतर अक्षयने बेळगावातून पलायन केले. कौटुंबिक वादातून सुधीरच्या पत्नीसह मुलीने त्याच्या खुनाचा कट रचला होता. त्यामुळे रोहिणी, स्नेहा आणि अक्षय या तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी मयत सुधीर कांबळे यांच्या घरातून एक चाकू जप्त केला आहे. एसीपी खडेबाजार यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प पोलिसांनी खुनाचा उलगडा करून आरोपींना गजाआड केल्याबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.