अधिकृत बस थांबा असून देखील गेल्या 8 -10 दिवसांपासून परिवहन मंडळाची एकही बस तेथे थांबत नसल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असलेल्या संतप्त विद्यार्थ्यांनी जवळपास 2 तास ‘बस रोको’ आंदोलन छेडल्याची घटना आज सोमवारी सकाळी मच्छे नेहरूनगर येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की, मच्छे नेहरूनगर परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी -विद्यार्थिनींना शाळा महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज बेळगाव शहरात यावे लागते. यासाठी बहुतांश विद्यार्थी विद्यार्थिनींना बस सेवेचा आधार घ्यावा लागतो. नेहरूनगर परिसरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या सोयीसाठी बेळगाव -खानापूर मार्गावर नेहरूनगर क्रॉस येथे अधिकृत बस थांबा देखील आहे.
या ठिकाणी शहर बस सेवेसह खानापूरहून येणाऱ्या बसेस थांबत असल्यामुळे सकाळी शाळा महाविद्यालयांना जाणाऱ्या मुलांची चांगली सोय होत होती. मात्र अलीकडे गेल्या आठ-दहा दिवसापासून सदर बस थांबायच्या ठिकाणी एकही बस थांबत नसल्यामुळे खास करून विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे.
मच्छे नेहरूनगर येथे एक सरकारी वस्तीगृह ही आहे. या ठिकाणी सुमारे 250 ते 300 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसह स्थानिक विद्यार्थी विद्यार्थिनींची नेहरूनगर क्रॉस येथील बस थांब्याच्या ठिकाणी सकाळी 6:30 -7 वाजल्यापासून मोठी गर्दी असते. मात्र अलीकडे बस थांबायच्या ठिकाणी एकही बस थांबत नसल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांमध्ये सकाळच्या वेळी असणारे पहिले एक-दोन वर्ग बुडून शैक्षणिक नुकसान होत आहे. बस थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबवाव्यात याबाबत वारंवार अर्ज विनंती करून देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आज सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास बेळगाव -खानापूर मार्गावरील मच्छे नेहरूनगर येथे प्रारंभी रास्ता रोको करून सर्वच वाहने अडवली होती.
मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर विद्यार्थ्यांनी खानापूरकडून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या फक्त बस गाड्या अडवून ‘बस रोको’ आंदोलन छेडले. मोठ्या संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून बसेस अडवल्यामुळे सदर मार्गावर शहर व परगावच्या बस गाड्यांची रांग लागली होती. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांची समजूत काढली.
तसेच आपण कार्यालयात बसून चर्चेअंती तोडगा काढुया असे सांगून अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रमुख नागरिक व विद्यार्थी प्रतिनिधींना आपल्या कार्यालयात पाचारण केले. परिवहन अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सुमारे 2 तास चाललेले बस रोको आंदोलन मागे घेण्यात आले. सदर आंदोलनामुळे मच्छे नेहरूनगर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.