बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण अधिक आहे. बेळगावमधील स्थानिक भाजी उत्पादक गोव्याला भाजी पुरविण्यावर अधिक भर देतात. बेळगावातून गोवा सरकार व तेथील व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भाजीपाला पुरविला जातो. मात्र आता गोवा सरकार परगावातून होणारी भाज्यांची आवक थांबवून भाजीपाला, फळे, दूध आदींचे उत्पादन राज्यातच करण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संकेत दिले असून बेळगावमधील भाजी विक्रेत्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
बेळगावमधील एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होते. सध्या बेळगावमध्ये दोन ठिकाणी एपीएमसी सुरु झाल्या असून यामुळे सरकारी एपीएमसी मधील व्यापारी संतापले आहेत. खाजगी एपीएमसीमुळे आपल्याला फटका बसत असल्याची तक्रार करत आहेत. हा तिढा अजून सुटला नाही मात्र आता बेळगावमधून मोठ्या प्रमाणात गोव्याला पुरविल्या जाणाऱ्या भाजीपाल्यासाठी गोव्याची दारे बंद होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
गोवा सरकार बेळगावातून होणारी भाजीपाल्याची आवक बांध करून स्वतः भाजीपाला पिकविण्याच्या विचारात आहे. यासंदर्भातील संकेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले असून यामुळे बेळगावमधील अनेक व्यापारी आणि शेतकरी आणखीन अडचणीत येणार आहेत. गोव्यात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक शेती विषयावरील कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हि माहिती दिली असून गोव्याला स्वयंपूर्ण राज्य बनविण्याच्या दृष्टिकोनातून असे निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेजारील राज्यातून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून न राहता भाजीपाल्यासह फळे, दूध आदींचे उत्पादनदेखील राज्यातच करण्याची तयारी सुरु करण्यासंदर्भात त्यांनी सूतोवाच केले.
राज्य फलोत्पादन महामंडळ दररोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळे खरेदी करून गोव्यात अनुदानित दराने विक्री करते. त्यात बेळगावातून येणाऱ्या भाजीपाल्याचे प्रमाण अधिक असून आगामी काळात भाजीपाल्याचे स्थानिक उत्पादन वाढविण्यासाठी महामंडळ बेळगावातून होणारी भाजीपाला खरेदी बंद करण्याची शक्यता आहे. ज्या गोष्टींची गरज आहे त्यांचे किमान निम्मे उत्पादन गोव्यातच तयार केले पाहिजे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
अवघ्या १०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोवा राज्यात बेळगावातून दररोज ५० हुन अधिक भाजीपाल्याची वाहने जातात. प्रत्येकी वाहनात ८ ते १० टन भाजीपाला गोव्यात पोहोचविण्यात येतो. मात्र गोवा राज्यात भाजीपाल्याचे उत्पादन सुरु झाल्यास बेळगावच्या व्यापाऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यापूर्वीही गोव्यात भाजीपाला उत्पादन घेण्याचे प्रयत्न झाले होते मात्र ते प्रयत्न अपयशी ठरले होते. तेथील वातावरण आणि मातीचा विचार करता आपल्या गरजे इतका भाजीपाला गोवा स्वतः तयार करणे अशक्य असल्याचे मत व्यापारीवर्गातून व्यक्त होत आहे.