Saturday, November 16, 2024

/

अग्निवीर भरती मेळाव्याला प्रारंभ; हजारोंची गर्दी

 belgaum

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे ‘अग्निवीर’ अंतर्गत सोल्जर जनरल ड्युटी, ट्रेड्समन, क्लार्क, स्टोअर किपर व टेक्निकल या पदांसाठी आयोजित भव्य भरती मेळाव्याला आज सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सदर भरतीसाठी हजारो युवक शहरात दाखल झाल्यामुळे मराठा सेंटरच्या शिवाजी स्टेडियम परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

केंद्र सरकारच्या अग्नीवीर योजनेअंतर्गत बेळगावात होणारा हा पहिलाच भव्य लष्कर भरती मेळावा असून तो 8 दिवस म्हणजे येत्या 26 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून सर्व ती सिद्धता करण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे. अग्निवीर भरतीसाठी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश व गोवा या राज्यातील युवक हजारोच्या संख्येने बेळगाव दाखल झाले आहेत. युवक गेल्या शनिवारपासूनच बस व रेल्वेने भरतीच्या ठिकाणी येताना दिसत होते. आज पहाटेपासून त्यात अधिकच भर पडल्यामुळे कॅम्प परिसरात सकाळी युवकांची गर्दी पहावयास मिळाली. युवकांना भरतीच्या ठिकाणी व्यवस्थित पोहोचता यावे यासाठी आयोजकांनी कॅम्प येथील कांही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवून तेथील वाहतूक इतर मार्गाने वळवली आहे.

मराठा सेंटरच्या शिवाजी स्टेडियम येथे आज सकाळी 7 वाजता भरतीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ॲडमिट कार्ड तपासूनच काटेकोरपणे उमेदवारांना भरतीच्या ठिकाणी प्रवेश दिला जात होता. अग्निवीरच्या आजच्या पहिल्या दिवशी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी भरती प्रक्रिया सुरू असून ती सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. आजच्या या भरतीसाठी सुमारे 2000 उमेदवारांनी हजेरी लावली होती. भरतीसाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी आज सकाळी त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या खेरीज पाऊस व उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी भरती क्षेत्र परिसरात ठीक ठिकाणी तंबू उभारण्यात आले असून पिण्याचे पाणी आणि मोबाईल टॉयलेटची सोय देखील करण्यात आली आहे.Agniveer

आज फक्त खेळाडूंसाठीची भरती असल्यामुळे ठराविक प्रमाणात गर्दी होती. मात्र उद्यापासून सोल्जर जनरल ड्युटी व अन्य पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. उद्या दि. 20 व त्यानंतर दि. 21 सप्टेंबर रोजी अग्नीवीर जनरल ड्युटी पदासाठी फक्त महाराष्ट्राकरिता भरती प्रक्रिया होईल. पुढे दि. 22 सप्टेंबर रोजी अग्नीवीर जनरल ड्युटी पदासाठी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि गोवा राज्याकरिता शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी करण्यात येणार आहे. दि. 23 सप्टेंबर रोजी अग्नीवीर जनरल ड्युटी पदासाठी फक्त कर्नाटक व आंध्रप्रदेश करिता शारीरिक क्षमता आणि मोजमाप होणार आहे.

दि. 24 सप्टेंबर रोजी अग्नीवीर ट्रेड्समन पदासाठी सर्व जातींकरता (फक्त लष्करात सेवा बजावणाऱ्यांचे नातलग व माजी सैनिकांसाठी) शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी होणार आहे. त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे दि. 26 सप्टेंबर रोजी अग्नीवीर क्लार्क, स्टोअर कीपर टेक्निकल करिता सर्व वर्गांसाठी भरती होणार आहे. भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांची लेखी परीक्षा (सामान्य प्रवेश परीक्षा) येत्या नोव्हेंबर 2022 मध्ये घेतली जाणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.