Monday, December 30, 2024

/

शैक्षणिक परिवर्तन चळवळीतील नवदुर्गा : रश्मी पै

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : देशभरात नवरात्रोत्सव साजरा होत आहे. देशातील प्रत्येक भागात नऊदिवस आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा अर्चना केली जाते. आनंददायी आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजऱ्या होणाऱ्या नवरात्रीत आजच्या काळातील नवदुर्गांचेही स्थान तितकेच महत्वाचे आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये नवदुर्गा सामावली आहे. अनेक नात्यांच्या माध्यमातून नवदुर्गेच्या स्वरूपात आपल्या आजूबाजूला वावरणारी प्रत्येक स्त्री हि नवदुर्गाच आहे. ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून गेली ३ वर्षे अशा नवदुर्गांचा सन्मान ‘नवदुर्गा’ या सदराच्या माध्यमातून केला जातो. आजची आपली नवदुर्गा आहे, शैक्षणिक परिवर्तन चळवळीत मोलाची कामगिरी बजाविणाऱ्या रश्मी पै! नवरात्रीच्या निमित्ताने या नवदुर्गेच्या आयुष्याच्या प्रवासाबाबत ‘टीम बेळगाव लाईव्ह’ ने केलेली खास बातचीत…

एक काळ होता जिथं महिलांना शिक्षणाचं नाव जरी घ्यायचं म्हटलं तरी पाप ठरवलं जायचं! महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या शैक्षणिक परिवर्तन चळवळीनंतर अनेक महिला शिक्षणासाठी पुढे सरसावल्या. वर्षे उलटत गेली, परिस्थिती बदलत गेली आणि महिलांनी समाजात उत्तुंग स्थान निर्माण करायला सुरुवात केली. अनेक अडचणी, संकटांचा सामना करत आज अनेक महिला उत्तुंग कामगिरी बजावत आहेत… ज्या शिक्षणाच्या नावाची धास्ती महिलांना असायची आज त्याच शिक्षण क्षेत्रात महिलांची मक्तेदारी आहे… बेळगावमधील राणी चन्नम्मा विद्यापीठात रश्मी पै नावाची नवदुर्गा विद्यापीठातील महत्वाच्या विभागात कार्यरत आहे.

राणी चन्नम्मा विद्यापीठात परीक्षा विभागात सहायक कुलसचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या रश्मी पै यांनी एमएसडब्ल्यू या विषयात डॉक्टरेट केली आहे. सध्या राणी चन्नम्मा विद्यापीठात गोपनीय विभागात तसेच पीएचडी विभागातील परीक्षा विभागात त्या कार्यरत आहेत. प्रश्नपत्रिका वितरण, उत्तरपत्रिका पुस्तिका वितरण, परीक्षेसाठी विविध महाविद्यालयांत परीक्षा केंद्र स्थापन करणे, या महाविद्यालयाशी इतर महाविद्यालये संलग्न करणे, भरारी पथकांची नियुक्ती, पथकात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देणे, आदेश देणे, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जबाबदारी रेश्मा पै पार पाडत आहेत. याचप्रमाणे विद्यापीठातील पीएचडी कार्यक्रम, महाप्रबंधांचे व्हॅल्युएशन, आणि पीएचडी धारकांना पदवी प्रदान करणे यात देखील रश्मी पै महत्वाची भूमिका बजावतात. इतकेच नाही तर परीक्षा काळात होणाऱ्या गैरप्रकारांची चौकशी, परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची चौकशी यासाठी स्वतंत्र पॅनल स्थापन करून चौकशी करणे हि जबाबदारी देखील रश्मी पै पार पाडतात.

दिल्ली, मुंबई, भद्रावती अशा भारतातील विविध भागातून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. अलाहाबाद येथे पदवीपूर्व शिक्षण, लिंगराज महाविद्यालयात पदवी, कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथे पदव्युत्तर शिक्षण आणि नोकरदार महिलांची विश्रांती या विषयावर आधारित प्रबंधावर पीएचडी असे शिक्षण घेतलेल्या रश्मी पै यांनी सुरुवातीची ८ वर्षे पदव्युत्तर विभागातील एमएसडब्ल्यू विभागात प्राध्यापिका म्हणूनही काम पाहिले आहे. मानसशास्त्रीय संबंधित विषय आणि समुपदेशन या दोन महत्वाच्या विषयावर त्यांनी अध्यापन केले आहे.Rashmi

आपल्या आई वडिलांकडून प्रेरणा घेऊन आपण इथवर पोहोचू शकलो, आपल्या आजवरच्या यशात आई वडिलांनी दिलेली साथ महत्वाची असल्याचे त्या सांगतात. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी सरळ दृष्टिकोन ठेवावा, पारदर्शक, रोखठोख, सचोटी, जिद्द आणि स्वच्छ वृत्ती हि यशाच्या मार्गाची गमक आहेत, असे त्यांचे मत आहे. आपण आपले ध्येय प्रामाणिकपणाने पूर्ण केले तर आयुष्यात आपल्याला कोणत्याही अडचणींचा सामना करणे सहज शक्य आहे. सरळ मार्ग आणि सरळ दृष्टिकोन असेल तर आयुष्यातील कठीण पायरीही सहजपणे पार करता येणे शक्य असल्याचे त्या सांगतात.

सर्व क्षेत्रात आत्मविश्वासाने आणि हिरीरीने पुढे सरसावलेल्या कर्तृत्ववान स्त्रियांनी शैक्षणिक, सामाजिक विकासाला हातभार लावला आहे. शिक्षण हे स्त्रीसाठी पाप मानले जायचे. मात्र महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या परिवर्तन चळवळीनंतर रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, बनुबाई अहो यासारख्या अनेक कर्तबगार स्त्रियांनी शिक्षण क्षेत्रात मोठी मजल मारली. आज महिलांनी शिक्षण क्षेत्रात उत्तुंग भरारी मारत आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे. अशा या परिवर्तन चळवळीतील रश्मी पै यांचीही कामगिरी मोलाची ठरत आहे. त्यांच्या या कार्याला ‘टीम बेळगाव लाइव्ह’च्या खूप साऱ्या शुभेच्छा!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.