काळ इतक्या झपाट्याने बदलत आहे की आता कारागृहातील कैदी देखील हायटेक झाले आहेत. खुनाच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या पालिकेच्या एका सदस्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चक्क नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाग घेऊन आपल्या प्रभागाच्या समस्या मांडल्याची घटना बेळगाव जिल्ह्यात घडली आहे.
खुनाच्या आरोपाखाली कारागृहात असलेल्या आरोपीने व्हिडिओ काॅलच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थिती दर्शवत आपल्या प्रभागातील समस्यांबाबत चर्चा केल्याची घटना हुक्केरी (जि. बेळगाव) तालुक्यातील संकेश्वर नगरपालिकेमध्ये घडली आहे.
खुनाच्या आरोपाखाली बेळगावच्या हिंडलगा कारागृहात असलेला संकेश्वरमधील प्रभाग क्र. 14 च्या भाजप नगरसेवक उमेश कांबळे याने न्यायालयाच्या परवानगीने कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हजेरी लावली.
पैशाच्या व्यवहारातून आठ महिन्यापूर्वी संकेश्वर येथे एका महिलेचा गावठी पिस्तुलीच्या गोळ्या झाडून खून केल्याचा आरोप संकेश्वर नगरपालिकेचा सदस्य असणाऱ्या उमेश कांबळे याच्यावर आहे.
तथापि त्याच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झाला नसल्यामुळे लोकप्रतिनिधी या नात्याने त्याला सर्वसाधारण सभेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आभासी हजेरी लावण्यास परवानगी मिळाल्याचे समजते.