Friday, December 27, 2024

/

हिम्मत असेल तर कर्नाटकातील नेत्यांवर कारवाई करून दाखवा -राव

 belgaum

देशातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याची भाषा करणाऱ्या केंद्र सरकारमध्ये खरोखर हिम्मत असेल तर त्यांनी प्रथम कर्नाटकातील भ्रष्ट सत्ताधारी मंत्री, लोकप्रतिनिधी विशेष करून बेळगाव दक्षिणच्या आमदाराविरुद्ध ईडी किंवा सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, असे आव्हान आम आदमी पार्टीचे (आप) कर्नाटक राज्य उपाध्यक्ष भास्करराव यांनी दिले.

शहरामध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेळगाव दक्षिणचे आमदारांनी मोठ्या प्रमाणात अवैध मालमत्ता जमविल्याचा आरोप असून त्यासंबंधी एसीबीकडे गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी दाखल केलेला सॅक्शन ऑफ प्रोसिक्युशन अर्ज खुद्द सभापतींनी फेटाळून लावला आहे. या पद्धतीने भ्रष्ट लोकप्रतिनिधींना पाठीशी घालण्याचे काम सध्या भाजप करत आहे. बेळगाव दक्षिण आमदारांच्या विरोधात लोकायुक्त चौकशी आणि तपासाला परवानगी दिली जात नाही हा एक प्रकारे बेळगावचा अवमान आहे. जे चुकीचे घडत आहे त्याच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्याऐवजी त्याचे समर्थन करणे, एका भ्रष्ट लोकप्रतिनिधीला पाठिंबा देण्याची ही चुकीची आणि अत्यंत खेदजनक कृती आहे.

केंद्र सरकारने विरोधी पक्ष नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय वगैरेंचा ससेमीरा लावला आहे. केंद्राला खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराचे उच्चाटन करायचे असेल तर त्यांनी प्रथम कर्नाटककडे लक्ष द्यावे. येथील बहुसंख्य मंत्री 40 टक्के कमिशनच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप आहे. हा आरोप आपने किंवा अन्य कोणत्याही विरोधी पक्षाने केला नसून खुद्द कंत्राटदारांनीच केला आहे.AAp bhaskar rao

संबंधित मंत्री व लोकप्रतिनिधी विरोधात ईडी, सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यास कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येईल. मात्र तसे न होता त्याचा अवलंब विरोधी पक्षांच्या विरोधात केला जात आहे. तुमच्यात एवढी ताकद असेल तर बेळगाव दक्षिणच्या आमदारा विरोधात ईडी किंवा सीबीआय चौकशीचा आदेश द्या. अजूनही वेळ गेलेले नाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे एक उत्तम स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी आहेत ते बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. तेंव्हा या जिल्ह्याबद्दल खरोखर आत्मीयता असेल तर त्यांनी त्वरित कारवाईचे आदेश देऊन बेळगाव जिल्ह्याची मानमर्यादा राखावी. बेळगाव दक्षिणचे आमदार किती भ्रष्ट आहेत आणि सरकारी अधिकारी व नागरिकाबरोबरचे त्यांचे उन्मत्त वागणे याबाबत नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, अन्यथा आगामी निवडणुकीत जनता त्यांना चांगला धडा शिकवेल, असेही भास्करराव यांनी स्पष्ट केले.

भ्रष्टाचाराच्या विषयानंतर राव यांनी जिल्ह्यातील साखर उद्योगातील समस्यांकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. उत्तर कर्नाटकातील सर्वसामान्य शेतकरी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर ओढाविलेली बिकट परिस्थिती कथन करून आम आदमी पार्टी शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजनेतील भ्रष्टाचारावर देखील त्यांनी जोरदार टीका केली. राजकीय नेते अधिकारी आणि कंत्राटदार यांच्याकडून संगणमताने स्मार्ट सिटीचा निधी कसा हडप केला जात आहे, याची त्यांनी थोडक्यात माहिती दिली. 40 टक्के कमिशनच्या आरोपाच्या बाबतीत पुरावा मागितला जातो. मात्र कोणतेही कमिशन, लाच ही पोचपावती देऊन घेतली जात नाही. त्याचा कोणताही पुरावा नसतो. त्याचा पुरावा एकच म्हणजे निकृष्ट दर्जाची विकास कामे हा होय. तेंव्हा विकास कामांचे नियोजन व दर्जानुसार संबंधितांना जबाबदार धरून दोषी ठरवले पाहिजे, असेही भास्करराव म्हणाले.

यावेळी बोलताना आम आदमी पार्टीचे स्थानिक युवा नेते राजकुमार टोपण्णावर यांनी बेळगाव स्मार्ट सिटीची निकृष्ट दर्जाची विकास कामे आणि या योजनेतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आपला पक्ष सातत्याने आवाज उठवत आहे असे सांगितले. तसेच बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदार तसेच बेळगावचे दोन्ही आमदार आणि खासदारांच्या विरोधात आपला पक्ष लवकरच सीबीआय चौकशीची मागणी करणार असल्याचेही टोपण्णावर यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस आम आदमी पार्टीचे शंकर हेगडे, विजय शास्त्रीमठ, अब्दुल तवाफ, शेख फैजाबाद, अहमद सौदागर, गंगाधर संपतकुमार, विनायक देसाई, न्यूमन, एम. के. सईद, समीर सईद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.