मयुरी शिवलकर आणि मेघ शिवलकर हे दोघे बेळगावचे मायलेक क्रीडापटू अमेरिकेतील कोना (हवाई) येथे होणाऱ्या जगातील प्रतिष्ठेच्या आयर्न मॅन जागतिक अजिंक्यपद शर्यतीसाठी पात्र ठरले आहेत. सदर शर्यतीसाठी पात्र ठरणारा मेघ हा पहिला सर्वात युवा भारतीय क्रीडापटू तर मयुरा या पहिल्या कॅन्सर वॉरियर भारतीय ट्रायथलीट आहेत हे विशेष होय.
आयर्न मॅन जागतिक अजिंक्यपद शर्यतीच्या गेल्या 14 ऑगस्ट रोजी कझाकस्तान येथे झालेल्या पात्रता स्पर्धेमध्ये मेघ शिवलकर याने 11:48.55 तास इतका कालावधी देऊन 18 ते 24 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
हवाई येथे 1978 पासून दरवर्षी आयर्न मॅन जागतिक अजिंक्यपद शर्यत आयोजित केली जाते. तत्पूर्वी या शर्यतीसाठी क्रीडापटूंना अनेक पात्रता फेऱ्या पार कराव्या लागतात. मेघ येत्या सप्टेंबरच्या मध्यावधीला उच्च शिक्षणासाठी बोस्टन येथील नॉर्थ ईस्ट युनिव्हर्सिटीमध्ये दाखल होणार आहे.
मेघ याची आई मयुरा शिवलकर यादेखील एक नामांकित क्रीडापटू आहेत. कझाकस्तान येथील पात्रता शर्यत 11:18.06 तासात पूर्ण करून कोना येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या त्या पहिल्या कॅन्सर वॉरियर भारतीय ट्रायथलीट आहेत. मात्र दुर्दैवाने व्हिसा समस्येमुळे त्या कोना येथील स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीत. क्रीडाप्रेमी मयुरा शिवलकर यांनी कॅन्सर पीडितांसाठी ग्रामीण भागातील रुग्णांकरिता पैसे जमा करून बेळगाव कॅन्सर हॉस्पिटलला मोलाची मदत केली आहे.
वर्ल्ड ट्रायथलाॅन कार्पोरेशनतर्फे आयोजित (डब्ल्यूटीसी) आयर्न मॅन ट्रायथलाॅन स्पर्धा ही दीर्घ पल्ल्याची असते. त्यामध्ये 2.10 तासांच्या कालावधीत 2.4 मैल (3.86 कि.मी.) पोहणे,112 मैल (180.25 कि.मी.) सायकलिंग 6.20 तासात पूर्ण करणे, (स्विम सायकल 10.30 तास) आणि 26.22 मैलाची (42.20 कि.मी.) मॅरेथॉन धाव यांचा समावेश असतो.
क्रीडापटूंना या सर्व शर्यती अथक सलगपणे 1630 तासांपेक्षा कमी वेळेत पूर्ण कराव्या लागतात. आयर्न मॅन शर्यत हा जगातील सर्वात खडतर एकदिवशीय क्रीडा प्रकार मानला जातो. या जागतिक शर्यतीसाठी पात्र ठरल्याबद्दल मयुरा व मेघ शिवलकर यांचे सर्वत्र विशेष करून क्रीडाप्रेमींमध्ये अभिनंदन होत आहे.