गोल्फ मैदान येथे ठाण मांडून असलेल्या बिबट्याला सध्या जिवंत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र जर तो मनुष्यासाठी घातक ठरला तर त्याला वन्यजीव संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार सरकारच्या आदेशावरून ठार केले जाऊ शकते, अशी माहिती प्रसिद्ध वकील ॲड. मारुती कामाणाचे यांनी दिली.
दोन हत्ती, ट्रँक्यूलायझर, शार्प शूटर्स, 27 ट्रॅप कॅमेरे, 8 ते 10 पिंजरे, 200 वन खात्याचे कर्मचारी आणि जवळपास तितकेच पोलीस कर्मचारी गेल्या 20 दिवसांपेक्षा अधिक काळापासून बेळगाव गोल्फ मैदान परिसरात बिबट्याचा शोध घेत आहेत. मात्र अद्यापपर्यंत बिबट्या त्यांच्या हाती लागलेला नाही. बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांच्या बाबतीत कायदा काय सांगतो? हे बेळगाव लाईव्हने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ॲड. मारुती कामाणाचे यांनी उपरोक्त माहिती दिली.
वन्यजीव संरक्षण कायदा -1972 ज्याला इंग्रजीत वाइल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट -1972 असे म्हंटले जाते. कोणत्याही प्राण्याला ठार मारता कामा नये असे हा कायदा सांगतो. मात्र जर नागरी वसाहतीमध्ये घुसलेल्या एखाद्या वन्य प्राण्यांपासून मनुष्याला धोका असेल. तो प्राणी मनुष्यांचे बळी घेत असेल तर त्याला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 11 मधील तरतुदीनुसार ठार मारता येते. आपल्या भागातील नागरिकांच्या जीविताला एखाद्या वन्य प्राण्यापासून धोका असेल तर स्थानिक आमदार संबंधित प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वनमंत्र्यांकडे करू शकतात. संबंधित प्राणी मनुष्यावर हल्ला करत असेल. त्या प्राण्यामुळे सर्वसामान्य नागरिक, लहान मुले, वयस्क मंडळी किंवा अपंग व्यक्तींना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले असेल तर वनमंत्री स्थानिक जिल्हाधिकारी (कलेक्टर) व आमदारांशी चर्चा करून कलम 11 नुसार त्या प्राण्याच्या बाबतीत शूट ॲट साईट अर्थात दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश काढू शकतात, असे ॲड. कामाणाचे यांनी स्पष्ट केले.
सदर माहिती देताना त्यांनी गेल्या 2020 साली तुमकुर येथे घडलेल्या घटनेचा संदर्भ दिला. तुमकुर येथे नागरी वसाहतीमध्ये प्रवेश केलेल्या बिबट्यापासून तेथील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. तेंव्हा तत्कालीन वनमंत्री आनंद यांनी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम 11 नुसार त्या बिबट्याच्या बाबतीत शूट ॲट साईटचा आदेश दिला होता असे सांगून बेळगावात गेल्या 20 दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र तरीही सरकार वन्यजीव कायद्याचे पालन करताना दिसत आहे. शक्यतो बिबट्याला जिवंत पकडून पुन्हा जंगलात सोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र हा बिबट्या जर मनुष्यासाठी धोकादायक ठरू लागला तर त्याला कायद्यानुसार ठार मारले जाऊ शकते, असे ॲड. मारुती कामाणाचे यांनी शेवटी सांगितले.
दरम्यान वाघ, सिंह, बिबट्या या सारख्या वन्यजीवांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. त्या अनुषंगाने वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार बेळगाव गोल्फ मैदानात दडी मारलेल्या बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी बेळगाव वनखात्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शक्यतो इजा न पोहोचवता त्या बिबट्याला जिवंत पकडून जंगलात सोडावे अशी अपेक्षा पशुप्रेमींसह जाणकार मंडळींकडून व्यक्त होत आहे.
When the law says junglee animals can be killed if they are life threating to human beings
than why cannot stray dogs be caught and left away from city area , which are life treatening to children . Stray dogs in city area are more dangerous to children than these animals.———-
—Avinash.A.khannukar 9448420930
Belgaum